Join us  

प्राप्तिकर खात्याला फोरेन्सिक तज्ज्ञांची आता होणार मदत

By admin | Published: January 05, 2017 2:32 AM

राजकारणी, नोकरशहा आणि व्यावसायिक यांनी केलेल्या संशयित मनी लाँड्रिंग व्यवहारांचा तपास करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने तीन मोठ्या लेखा परीक्षक संस्थांमधून तीन फोरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेत आहे.

नवी दिल्ली : राजकारणी, नोकरशहा आणि व्यावसायिक यांनी केलेल्या संशयित मनी लाँड्रिंग व्यवहारांचा तपास करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने तीन मोठ्या लेखा परीक्षक संस्थांमधून तीन फोरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेत आहे. ईवाय, केपीएमजी आणि प्राईस वॉटर हाऊस कूपर्स (पीडब्ल्यूसी) या संस्थांतील तज्ज्ञ सध्या प्राप्तिकर अधिकाऱ्यांसोबत काम करीत आहेत. प्राप्तिकर विभागाने ८ नोव्हेंबरपासून गोळा केलेल्या पुराव्यांची तपासणी हे तज्ज्ञ करीत आहेत. तपासाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, प्राप्तिकर विभागाने धाडी घातलेल्या काही लोकांनी लेखा परीक्षणात गडबड करून तसेच विदेशातून हवालाच्या मार्गाने पैसा आणला असावा, असा संशय आहे. या व्यवहारांचा छडा लावण्यासाठी जागतिक पातळीवरील संस्थांच्या तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.नालंदा लॉ असोसिएट्सचे राजीव सिंग म्हणाले की, या प्रकरणातील आरोपींनी वैध संस्थांच्या नावे पावत्या दाखवून बेहिशेबी पैसा बँकांत भरला असावा. तथापि, हा पैसा ज्या मार्गाने येतो, तेथे काही पुरावे राहतातच. त्यांच्या आधारे आरोपींविरोधात खटले दाखल होऊ शकतात. केंद्रीय थेट कर बोर्डाचे चौकशी आयुक्त रमेश कुमार यादव यांना यासंबंधी ई-मेल करण्यात आला होता. त्यांनी त्यावर पाठविलेल्या उत्तरात म्हटले की, आपणास व्यक्तीश: या निर्णयाची कोणतीही कल्पना नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)