बंगळुरू : अॅमेझॉन इंडियाने विद्यार्थी, गृहिणी आणि निवृत्त व्यावसायिकांना अर्ध-वेळ रोजगार देण्याचा निर्णय घेतला आहे. अॅमेझॉनच्या या निर्णयामुळे एकाच दगडात दोन पक्षी मारले जाणार आहेत. एक म्हणजे शिखर हंगामात (पीक सिझन) वितरण गतिमान राहण्यास मदत होईल आणि दुसरे म्हणजे उबेरप्रमाणे लवचिक रोजगारांची निर्मितीही करता येईल.
गतिमान आणि विश्वसनीय वितरण हा ई-कॉमर्स व्यवसायाचा आत्मा आहे. योग्य उत्पादनाचे वर्गीकरणाइतकीच ही बाबही महत्त्वाची आहे. गतिमान वितरणासाठी अॅमेझॉन इंडियाने याआधी अनेक पद्धती वापरल्या. एक दिवसात, दोन दिवसात अथवा नियोजित पोहोच यांचा त्यात समावेश आहे. अॅमेझॉनच्या ‘प्राईम आॅफर्स’मध्ये दुसऱ्या दिवशी वस्तू ग्राहकाच्या घरी पोहोचते. ठराविक वस्तूंवर ही योजना लागू आहे. ‘प्राईम नाऊ’मध्ये दोन तासांत पोहोच दिली जाते. किराणा सामान पोहोचविण्यासाठी प्राईम नाऊचा प्रामुख्याने वापर होतो.आता कंपनीने ‘अॅमेझॉन फ्लेक्स’ नावाची योजना आणली आहे. या योजनेद्वारे हजारो रोजगार निर्माण होतील. मोकळ्या वेळात काम करून अतिरिक्त पैसे कमाविण्याची संधी यातून लोकांना मिळेल. यात कोणाही व्यक्तीला चार तास काम करता येईल. त्यातून ताशी १२० ते १४० रुपये मिळतील. या अर्धवेळ वितरकांना दर बुधवारी कामाचा मोबला दिला जाईल. अॅमेझॉनचे उपाध्यक्ष (आशिया ग्राहक समाधान) अखिल सक्सेना यांनी सांगितले की, सध्याची आमची वस्तू पोहोच व्यवस्था कायमच राहणार आहे. अॅमेझॉन फ्लेक्सद्वारे आम्ही जास्तीची पोहोच क्षमता प्राप्त करणार आहोत. ही योजना पूर्ण क्षमतेने लागू करण्यापूर्वी बंगळुरू, मुंबई आणि दिल्लीत दोन आठवड्यांचा पथदर्शक प्रकल्प राबविला जाईल. त्यानंतर अधिक शहरांत हा प्रकल्प नेला जाईल.