Join us  

Hero MotoCorp ला दुहेरी धक्का! IT रेडनंतर शेअर कोसळले; गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 6:48 PM

एकीकडे आयकर विभागाची छापेमारी सुरू असताना, दुसरीकडे हीरो मोटोकॉर्पचे शेअर्स घसरल्याचे पाहायला मिळत आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभागाच्या कारवायांना वेग आल्याचे दिसत आहेत. देशभरात धाडसत्र सुरूच आहे. यातच प्राप्तिकर विभागाने हीरो मोटोकॉर्पचे चेअरमन आणि एमडी पवन मुंजाल यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली. मिळालेल्या माहितीनुसार, पवन मुंजाल निवासस्थानांवर आणि गुडगांवमधील ऑफिसमध्ये सर्च ऑपरेशन केले. यानंतर Hero MotoCorp कंपनीला दुहेरी फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे आयकर विभागाची छापेमारी सुरू असताना, दुसरीकडे हीरो मोटोकॉर्पचे शेअर्स घसरल्याचे पाहायला मिळत आहे. 

हीरो मोटोकॉर्प ही देशातील सर्वांत मोठी दुचाकी निर्माता कंपनी असून, कंपनीचे चेअरमन आणि एमडी पवन मुंजाल यांच्या निवासस्थानावर पडलेल्या छाप्यानंतर एकच खळबळ उडाली. केंद्रीय तपास यंत्रणांनी कार्पोरेट कंपन्यांवर लक्ष केंद्रीत केले असून, बिल्डर लॉबीवरही धाडी मारायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे गेल्या २ ते ३ दिवसांत आयकर विभागाने ३ बड्या उद्योग समुहांवर धाडी टाकल्या आहेत. त्यामध्ये, हिरानंदानी ग्रुप्स, ओमॅक्स आणि हिरो मोटोकॉर्पचा समावेश आहे.

हीरो मोटरकॉर्पचा शेअर गडगडला

Hero MotoCorp शेअर मंगळवारी २४२१.३० वर बंद झाला होता. तो बुधवारी सकाळी २४३३.०५ रुपयांवर खुला झाला. यानंतर कंपनीचे चेअरमन आणि एमडी पवन मुंजाल यांच्या घरावर आयकर विभागाच्या छाप्याची बातमी समोर आली. दिवसभराच्या व्यवहारादरम्यान कंपनीचा शेअर २३२८.८५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर गेला. याचाच अर्थ कंपनीच्या शेअरमध्ये ३.८१ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. व्यवहाराच्या शेवटी, हीरो मोटोकॉर्पचा शेअर मुंबई शेअर बाजारात २५.९० रुपयांनी घसरून २३९५.४० रुपयांवर बंद झाला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर मार्केटमध्ये हीरो मोटोकॉर्प कंपनीचा शेअर २९.६५ रुपयांनी घसरुन २३९४ रुपयांवर बंद झाला. 

दरम्यान, पवन मुंजाल यांच्यावर खात्यांमध्ये खोटे खर्च दाखवल्याचा आरोप आहे. प्राप्तिकर विभागाच्या पथकाला जे संशयास्पद खर्च सापडले आहेत, त्यामधील काही खर्च इनहाऊस कंपन्यांचेही आहेत. या छापेमारीबाबत हीरो मोटोकॉर्प आणि प्राप्तिकर विभागाने अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. 

टॅग्स :हिरो मोटो कॉर्पशेअर बाजारइन्कम टॅक्स