Join us  

Hero MotoCorp Ltd Share: Hero ला २३६६ कोटी रुपयांच्या प्रकरणात मोठा दिलासा, शेअरमध्ये तेजी; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 11:57 AM

Hero MotoCorp Ltd Share: देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हीरो मोटोकॉर्पच्या गुंतवणूकदारांसाठी खुशखबर आहे. कंपनीला एका प्रकरणात दिलासा मिळाला आहे.

Hero MotoCorp Ltd Share: देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हीरो मोटोकॉर्पच्या गुंतवणूकदारांसाठी खुशखबर आहे. जुन्या कराच्या बाबतीत कंपनीला मोठा दिलासा मिळालाय. २३३६.७१ कोटी रुपयांच्या टॅक्स डिमांड प्रकरणी आयटीएटीनं हीरो मोटोकॉर्पच्या बाजूनं निकाल दिला आहे. २०११-१२ च्या मूल्यांकनासाठी कंपनीकडून ही टॅक्स डिमांड करण्यात आली होती. आयटीएटीच्या (Income tax appellate tribunal) दिल्ली खंडपीठानं २४ जुलै रोजी हा आदेश दिला. तर या निर्णयाची माहिती कंपनीकडून २५ जुलै रोजी देण्यात आली होती.

शेअर्सची स्थिती कशी?

कंपनीचे शेअर्स आज बीएसईवर किरकोळ वाढीसह उघडले. पण अल्पावधीतच कंपनीचा शेअर ५४४४.०५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. कंपनीचा शेअर 0.56 टक्क्यांनी वधारून ५४३४.६५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. बीएसईवर हीरो मोटोकॉर्पचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ५८९४.३० रुपये आहे. ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २८८९.४० रुपये आहे.

गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ७२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर या शेअरमध्ये ६ महिन्यांत २१.९० टक्क्यांची वाढ झाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हे संपूर्ण प्रकरण होंडाच्या संयुक्त उपक्रमाशी संबंधित आहे. हीरो ग्रुपनं मार्च २०११ मध्ये होंडामधील २६ टक्के हिस्सा खरेदी केला होता. हीरो ग्रुपनं हीरो इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून हीरो होंडाचे ५.१९ कोटी शेअर्स खरेदी केले. हीरो मोटोकॉर्पने या २६ टक्के हिस्स्यासाठी होंडाला प्रति शेअर ७३९ दरानं ३८४१.८३ कोटी रुपये दिले. या संपूर्ण व्यवहाराचा थकीत करही भरण्यात आला. सध्या हीरो आणि होंडा भारतीय बाजारपेठेत दोन स्वतंत्र संस्था म्हणून काम करत आहेत.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :हिरो मोटो कॉर्पशेअर बाजार