Join us

Spicejet ला हायकोर्टाचा झटका; कलानिती मारन यांना 270 कोटी रुपये देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 3:16 PM

दिल्ली उच्च न्यायालयाने स्पाइसजेटची याचिका फेटाळून लावली आहे. जाणून घ्या प्रकरण...

Spicejet: देशातील मोठी विमान कंपनी स्पाइसजेटला(Spicejet) दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने मध्यस्थ न्यायाधिकरणाचा(Arbitral Tribunal) आदेश कायम ठेवत एकल न्यायाधीशांच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी करणारी स्पाइसजेटची याचिका फेटाळून लावली आहे. यामध्ये स्पाइसजेटला सन ग्रुपच्या कलानिती मारन यांना 270 कोटींहून अधिकची रक्कम परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

न्यायमूर्ती यशवंत वर्मा आणि न्यायमूर्ती धर्मेश शर्मा यांच्या खंडपीठाने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या 13 फेब्रुवारी 2023 च्या निर्देशानुसार ते आदेशाला स्थगिती देऊ शकत नाही. एकल न्यायाधीशांच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना, दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आज अंतरिम दिलासा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आता दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्पाइसजेटला कलानिती मारन यांना 270 कोटी रुपये परत करावे लागणार आहेत.

काय आहे प्रकरण ?स्पाइसजेटसाठी हा आदेश धक्कादायक आहे, त्यामुळेच आता त्यांनी या आदेशाला आव्हान दिले आहे. मारन आणि स्पाइसजेटमधील वाद 2015 मध्ये सुरू झाला होता. अजय सिंह यांनी मारन यांच्याकडून स्पाइसजेट परत विकत घेतली. मारन यांनी 2015 मध्ये अजय सिंग यांना एअरलाइनमधील 58.46% हिस्सा दिला होता. करारानुसार, मारन यांना त्यांच्या विमान कंपनीचे प्रवर्तक असताना त्यांनी गुंतवलेल्या पैशाच्या बदल्यात रिडीम करण्यायोग्य वॉरंट मिळणार होते. मारन यांना स्पाइसजेटमधील 26% हिस्सा मिळणार होता. पण त्यांना त्यांच्या वाट्याचे पैसे मिळाले नाही.

यानंतर मारन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आणि हे प्रकरण लवादाकडे गेले. 1300 कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा दावा मारन यांनी केला. 2018 मध्ये लवाद न्यायाधिकरणाने स्पाइसजेटला मारन यांना 270 कोटी परत करण्याचे आदेश दिले. याव्यतिरिक्त, न्यायाधिकरणाने स्पाईसजेटला वॉरंटसाठी भरलेल्या रकमेवर वार्षिक 12% आणि निधी हस्तांतरणास विलंब झाल्याबद्दल मारन यांना दिलेल्या रकमेवर वार्षिक 18% दराने व्याज देण्यास सांगितले. 

टॅग्स :स्पाइस जेटविमानव्यवसायगुंतवणूकपैसाउच्च न्यायालय