नवी दिल्ली - एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँकेनंतर आता आयडीबीआय बँकेनेही आपल्या फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरामध्ये वाढ केली आहे. बँकेने दोन कोटींहून कमी रकमेच्या फिक्स डिपॉझिटच्या व्याज दरांमध्ये वाढ केली आहे. बँक आता सहा दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या अवधी असलेल्या एफडीवर २.७० टक्क्यांपासून ते ५.६० टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याज देत आहे. नवे व्याजदर २० एप्रिलपासून लागू होत आहेत. बुधवारी एचडीएफसी बँकेने आपल्या एफडी व्याजदरांमध्ये बदल केला होता.
इकॉनॉमिक्स टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार आयडीबीआय बँक आता ३१ ते ४५ दिवसांच्या अवधीमध्ये मॅच्युअर होणाऱ्या फिक्स डिपॉझिटवर ३ टक्के दराने व्याज देईल. तर ४६ ते ६० दिवसांच्या अवधी असलेल्या एफडीवर व्याजदरामध्ये २५ बेसिक पॉईंटची वाढ करताना त्याला वार्षिक ३.२५ टक्के एवढे करण्यात आले आहे. ६१ ते ९० दिवसांच्या कालावधीच्या व्याजदरामध्ये ४० बेसिक पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. आता नवे दर ३.४० टक्के वार्षिक एवढा दर असेल.
दोन ते तीन वर्षांच्या अवधीत मॅच्युअर होणाऱया फिक्स डिपॉझिटसाठी आधी ५.२ टक्के दराने व्याज मिळत होते. आता व्याजाचा दर ५.३५ टक्के झाला आहे. त्याच प्रमाणे तीन ते पाच वर्षांच्या कालावधीतील एफडीचा व्याजदरही वाढवून ५.५० टक्के करण्यात आला आहे. आधी हा दर ५.४ टक्के होता.
ज्येष्ठ नागरिकांसाठी फिक्स डिपॉझिटवर आयडीबीआय बँकेकडून स्पेशल व्याजदर ऑफर केला जात आहे. सध्या बँक सिनियर सिटिझननां एफडीवर ३.२० टक्के ते ६.३५ टक्के व्याज देत आहे. सुविधा टॅक्स सेव्हिंग फिक्स डिपॉझिट, ज्याचा कालावधी पाच वर्षांचा आहे, त्याच्या व्याजदरांमध्ये १० बेसिक पॉईंटची वाढ करून तो ५.६ टक्के करण्यात आला आहे. आयडीबीआय नमन ज्येष्ठ नागरिक डिपॉझिट स्किममध्येही ०.२५ टक्के अधिक व्याज मिळेल. हे व्याज बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या ०.५ टक्के व्याजापेक्षे वेगळे असेल.