प्रसाद गो. जोशीजगभरातील बाजारांमध्ये असलेले आशादायक वातावरण, धातू आणि खनिज तेलाच्या दरांमध्ये झालेली वाढ, सलग दुसऱ्या सप्ताहात रुपयाच्या मूल्यामध्ये झालेली वाढ अशा वातावरणामध्ये भारतीय शेअर बाजारामध्ये सुमारे तीन टक्क्यांनी वाढ झाली. बाजारात झालेली साप्ताहिक वाढ ही चार महिन्यांमधील सर्वाधिक ठरली आहे. बाजाराने २७ हजारांची पातळी ओलांडल्याने गुंतवणूकदारांमध्ये नवा उत्साह दिसून येत आहे.मुंबई शेअर बाजारामध्ये गतसप्ताह हा तेजीचा राहिला. संवेदनशील निर्देशांकाने ३.२७ टक्क्यांची वाढ नोंदवून २७ हजार अंशांचा टप्पा ओलांडली. यामुळे गुंतवणुकदारांमध्ये भावनिक दृढता आली. सप्ताहाच्या अखेरीस निर्देशांक ८५८ अंशांनी वाढून २७७९.५१ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)२३८.८० अंश म्हणजे चार टक्कयांनी वाढून ८१८९.९ ० अंशांवर बंद झाला. बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली.अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीमध्ये व्याजदरामध्ये वाढ करण्यास मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने आता तेथील व्याजदर कायम राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. यामुळे परकीय वित्तसंस्था पुन्हा एकदा भारतासह आशियाई देशांमध्ये खरेदीसाठी वेगाने उतरल्या आहेत. गतसप्ताहात या संस्थांनी १७७२.५८ कोटी रुपयांची खरेदी केली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये खनिज तेल तसेच धातुंच्या किंमती वाढीस लागल्याने गुंतवणुकदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खनिज तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाल्यास बाजाराला आणखी स्थैर्य येऊ शकेल. धातुंच्या किंमतींमधील वाढ या क्षेत्रातील आस्थापनांना लाभदायक ठरणारी असल्याने या आस्थापनांचे समभागही वेगाने वर जाऊ लागलेले दिसून येत आहेत.दुसऱ्या तिमाहीच्या आर्थिक निकालांची घोषणा होण्यास प्रारंभ झाला आहे. टीसीएसने याचा प्रारंभ केला असून हे निकाल उत्साहवर्धक असल्याने बाजारात काहीसे चैतन्य आले. आगामी सप्ताहामध्येही अन्य आस्थापनांचे निकाल जाहीर होणार असून त्या त्या निकालांनुसार बाजारावर त्याचा परिणाम होणार आहे. मागील सप्ताहात सुरू झालेली रुपयाची बळकटी गतसप्ताहामध्येही कायम होती. सप्ताहामध्ये डॉलरच्या तुलनेत रुपया ६४.७२ पर्यंत वाढला. या दरम्यान देशातील सेवा क्षेत्रामध्ये आॅगस्ट महिन्यापेक्षा सप्टेंबरमध्ये घट झाली आहे. ५१.८ टक्कयांवरून हा निर्देशांक ५१.३ टक्कयांपर्यंत खाली आल्याचे जाहीर झाले आहे. परिणामी बाजारावर याचे पडसाद काही प्रमाणात उमटण्याची शक्यता आहे.
चार महिन्यांतील सर्वाधिक साप्ताहिक वाढ
By admin | Published: October 11, 2015 10:22 PM