उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल समोर आल्यापासून समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये झपाट्याने घसरण झाली आहे. आता यामुळे मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने समूहातील ४ कंपन्यांचे रेटिंग आउटलुक कमी केले आहे.
अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठी घसरण झाल्यामुळे मूडीजने आता अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी ग्रीन रिस्ट्रिक्टेड ग्रुप, अदानी ट्रान्समिशन स्टेप-वन आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड यांना निगेटिव्ह रेटिंग आऊटलूक अंतर्गत ठेवले आहे.
काय म्हटलंय मूडीजनं?ज्या अदानी समूहाच्या कंपन्यांचे रेटिंग आउटलुक आता मूडीजने 'निगेटिव्ह' केले आहे त्यांचे रेटिंग आउटलुक पूर्वी ‘स्टेबल’ होते. यावर मूडीजचे म्हणणे आहे की, हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात फसवणूक आणि हेराफेरीचे आरोप झाल्यानंतर समूह कंपन्यांच्या बाजार मूल्यांकनात मोठी घसरण झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अदानी कायदेशीर लढाईच्या तयारीतफायनान्शिअल टाईम्सच्या रिपोर्टनुसार, गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने हिंडेनबर्गशी कायदेशीर लढाई लढण्यासाठी अमेरिकन लॉ फर्म वचटेलची(Wachtell) निवड केली आहे. ही फर्म जगातील प्रसिद्ध फर्म असून, वादग्रस्त प्रकरणांमध्ये कायदेशीर लढाईसाठीही सर्वात जास्त चर्चेत असते. हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर गुंतवणूकदारांना पुन्हा समूहाकडे वळवण्याच्या दिशेने अदानींनी उचललेले हे मोठे पाऊल आहे.
कायदेशीर लढाई लढण्यास तयारअदानी समूहाच्या वतीने आधीच सांगण्यात आले होते की, ते शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चविरुद्ध कायदेशीर लढा देण्याची तयारी करत आहेत. आता, रिपोर्टनुसार, समूहाने शॉर्ट सेलर फर्मला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी न्यूयॉर्कस्थित वाचटेल लिप्टन, रोसेन आणि काट्जच्या टॉप वकिलांची फौज उभी केली आहे. दरम्यान, २४ जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या अहवालात अदानी समूहावर अकाउंटिंग फ्रॉड, स्टॉक मॅनिपुलेशनसह कर्जाबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.