अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गने अदानी समूहाबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. यात समूहावर अनेक आरोपही करण्यात आले होते. परंतु समूहाकडून सातत्यानं त्याचं खंडन करण्यात आलं. गेल्या काही महिन्यांपासून समूहानं अनेत मोठे निर्णयही घेतले आहेत. कंपनी अनेक व्यवसायांमधून आपला हात आखडता घेत आहे. जानेवारी 2023 मध्ये, हिंडेनबर्गनं अदानी समूहाबद्दल रिपोर्ट प्रसिद्ध केला. त्यानंतर गौतम अदानी आणि त्यांच्या कंपनीला एकामागून एक मोठे धक्क. आता त्याचा परिणाम त्यांच्या 10 वर्ष जुन्या व्यवसायावरही दिसून येत आहे. अदानी हा व्यवसाय गुंडाळच्या विचारात असल्याची माहिती समोर आलीये.
गौतम अदानी यांचा अदानी समूह नॉन-बँकिंग फायनान्स क्षेत्रातून आपला व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत आहे. अदानी समूहाची 10 वर्षे जुनी कंपनी अदानी कॅपिटल विकण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आलीये. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, गौतम अदानी नॉन-कोअर व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत आहेत आणि मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रीत करण्याची त्यांची इच्छा आहे. याअंतर्गत अदानी कॅपिटलची विक्री करण्याची तयारी सुरू करण्यात आलीये.
परदेशी कंपन्या रांगेत
अदानींची ही कंपनी विकत घेण्यासाठी अनेक परदेशी कंपन्या रांगेत आहेत. रिपोर्टनुसार, खाजगी इक्विटी फर्म बेन कॅपिटल, कार्लाइल ग्रुप आणि सेर्बरस कॅपिटल मॅनेजमेंट ही नावं गौतम अदानी यांची 10 वर्षे जुनी कंपनी खरेदी करण्यासाठी आघाडीवर आहेत. परदेशी कंपन्यांनी अदानींची शॅडो बँक अदानी कॅपिटल खरेदी करण्यात रस दाखवला आहे. येत्या काही आठवड्यांत बोली प्रक्रिया सुरू होण्याचीही शक्यता आहे.
का विकतायत कंपनी?
अदानी कॅपिटल विकण्यामागील प्रमुख कारण म्हणजे अदानी यांना नॉन-कोअर व्यवसायातून बाहेर पडून मुख्य व्यवसायावर पूर्ण लक्ष केंद्रित करायचं आहे. ज्यातून प्रामुख्यानं चांगला नफा मिळालेला नाही अशा व्यवसायांमधून बाहेर पडण्याची त्यांची इच्छा आहे. ही 2000 कोटींची कंपनी विकून निधी उभारला जाणार आहे. हा निधी मुख्य व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी उपयुक्त ठरेल.