Join us

पैशासाठी हिंडेनबर्गने दिला खाेटा अहवाल; गौतम अदानींनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 7:10 AM

बदनामीचा हाेता डाव : गौतम अदानी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अमेरिकी शॉर्ट सेलर संस्था हिंडेनबर्ग रिसर्चचा अदानी समूहाविरोधातील अहवाल खोटा होता, आमची पत बिघडवून नफा कमावण्याच्या उद्देशाने हा अहवाल तयार करण्यात आला होता, असे प्रतिपादन अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी मंगळवारी केले. अदानी एंटरप्रायजेसच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऑनलाइन पद्धतीने संबोधित करताना अदानी यांनी हे वक्तव्य केले.

हिंडेनबर्ग रिसर्चने २४ जानेवारी रोजी एक अहवाल जारी करून अदानी समुहावर घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यामुळे शेअर बाजारातही पडझड झाली हाेती. तसेच, समुहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायजेसचा समभाग ३,५०० रुपयांनी घसरून १ हजार रुपयांवर आला होता. अहवालात केलेले आरोप २००४ ते २०१५ या काळातील होते. त्याबाबत त्याचवेळी स्पष्टीकरण दिले होते. आरोपांचा तपास करण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीला गैरप्रकार आढळला नाही, असे अदानी यांनी सांगितले. हिंडेनबर्गचे कृत्य म्हणजे देशावरील हल्ला असल्याचेही अदानी यांनी यावेळी पुनरूच्चार केला.

सध्या जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असलेला भारत २०३० पर्यंत जगातील तिसरी, तर २०५० पर्यंत दुसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल. माझा अंदाज आहे की, आगामी दशकात भारताच्या जीडीपीत दरात १८ महिन्यांनी १ लाख कोटी डॉलरची भर पडण्यास सुरुवात होईल.    - गौतम अदानी, प्रमुख, अदानी समूह  

नवी मुंबई येथील विमानतळाबाबत काय म्हणाले?गौतम अदानी यांनी म्हटले की, नवी मुंबई विमानतळ डिसेंबर २०२४ पर्यंत सुरू होईल. अदानी समूह सध्या ७ विमानतळ चालवतो. अहमदाबाद, लखनौ, मंगळुरू, मुंबई, गुवाहाटी, जयपूर आणि तिरुवनंतपुरम यांचा त्यात समावेश आहे.

टॅग्स :गौतम अदानीव्यवसायशेअर बाजार