Join us

"नोटीसला उत्तर देण्याऐवजी आमच्यावरच आरोप लावताय"; हिंडेनबर्गवर SEBI प्रमुखांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 7:23 PM

SEBI Chief Madhabi Puri Buch : सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी रविवारी हिंडेनबर्गने केलेल्या गौप्यस्फोटानंतर स्पष्टीकरण दिलं.

Hindenburg Research Report : अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने गेल्या वर्षी अदानी समूहावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती या दोघांचे अदानी घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहारासाठी वापरलेल्या दोन्ही बनावट परदेशी फंडांमध्ये भागीदारी असल्याचा आरोप हिंडेनबर्ग रिसर्चने केला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. त्यानतंर आता माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी एक निवेदन जारी करून हिंडेनबर्गच्या आरोपांचे खंडन केले आहे. हा सेबीच्या विश्वासार्हतेवर हा हल्ला असल्याचे म्हणत नोटीसला उत्तर देण्याऐवजी आरोप लावले जात असल्याचे माधबी पुरी बुच यांनी म्हटलं आहे.

सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी रविवारी हिंडेनबर्गने केलेल्या गौप्यस्फोटानंतर स्पष्टीकरण दिलं. अमेरिकन संशोधन आणि गुंतवणूक कंपनी हिंडेनबर्ग रिसर्च सेबीच्या विश्वासार्हतेवर हल्ला करण्याचा आणि अध्यक्षांच्या चारित्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे, असे सेबी प्रमुखांनी म्हटलं आहे. हिंडेनबर्गने शनिवारी जारी केलेल्या एका अहवालात, अदानी समूहाविरुद्ध सेबी कारवाई करत नसल्याचे म्हटलं आहे. यामागे  सेबी प्रमुख आणि त्यांचे पती धवल बुच यांच्याशी संबंधित विदेशी निधीतील भागीदारी असू शकते, असा संशय हिंडेनबर्गने व्यक्त केला. त्यानंतर माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी संयुक्त निवेदन जारी केले.

आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंटच्या फंडात सिंगापूरस्थित खाजगी नागरिक म्हणून आम्ही गुंतवणूक करण्यात आली होती. माधवी पूर्णवेळ सदस्य म्हणून सेबीमध्ये रुजू होण्याच्या दोन वर्षांपूर्वी ही गुंतवणूक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. गुंतवणुकीच्या निर्णयावर धवलचा बालपणीचा मित्र आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी अनिल आहुजा यांचा प्रभाव होता आणि २०१८ मध्ये गुंतवणूक करण्यात आली आणि त्या फंडाने कधीही अदानी ग्रुप सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक केली नव्हती. २०१९ मध्ये सेबीची अध्यक्ष होण्यापूर्वी धवलची ब्लॅकस्टोनचे वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती ह त्यांच्या कौशल्यामुळे झाली होती असे निवेदनात म्हटले आहे.

"भारतातील विविध नियामक उल्लंघनांसाठी हिंडनबर्गला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटीसला उत्तर देण्याऐवजी सेबीच्या विश्वासार्हतेवर हल्ला करणे आणि सेबी अध्यक्षांच्या चारित्र्याची हत्या करण्याचा प्रयत्न करणे हे दुर्दैवी आहे," असेही या निवेदनात म्हटलं आहे.

नेमके आरोप काय?

हिंडेनबर्गच्या म्हणण्यानुसार, माधवी आणि त्यांच्या पतीने बर्म्युडा आणि मॉरिशसमध्ये ऑफशोअर फंडांमध्ये अघोषित गुंतवणूक केली होती. हे तेच फंड आहेत ज्यांचा वापर विनोद अदानी यांनी निधीचा अपहार करण्यासाठी आणि अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढवण्यासाठी केला होता. विनोद अदानी हे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे मोठे बंधू आहेत.

टॅग्स :सेबीअदानीशेअर बाजार