Hindenburg on Madhabi Puri Buch : हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपानंतर बाजार नियामक सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. हिंडेनबर्गच्या दाव्यानंतर काँग्रेसकडूनही माधबी पुरी बुच यांच्यावर एकामागून एक आरोप होत आहेत. माधबी पुरी बुच यांच्यावर हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर आयसीआयसीआय बँकेतून पगार घेणे आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांसाठी विषारी कार्यसंस्कृती असे अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. माधवी पुरी यांनी सेबी प्रमुख पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस सातत्याने करत आहे. मात्र, सेबी प्रमुखांनी आतापर्यंत केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हणत स्पष्टीकरण दिले आहे. हिंडेनबर्गने सेबी प्रमुखांवर पुन्हा एकदा वार केला आहे.
सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्यावर हिंडेनबर्गने नवे आरोप केले आहेत. सेबीच्या पूर्ण वेळ सदस्य म्हणून कार्यरत राहताना आपल्या खासगी कंन्सल्टिंग फर्मच्या माध्यमातून अनेक लिस्टेड कंपन्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप माधवी पुरी बुच यांच्यावर लावण्यात आला आहे. या सल्लागार कंपनीत बुच यांची ९९ टक्के भागीदारी आहे. हिंडेनबर्गच्या म्हणण्यानुसार, सेबीच्या अध्यक्षांनी एकूण चार मोठ्या आणि सूचीबद्ध कंपन्यांकडून पैसे घेतले. हिंडेनबर्गने एक्स पोस्टवरुन हे आरोप केले आहेत.
काँग्रेसने केलेल्या आरोपांना उत्तर देताना, हिंडेनबर्ग रिसर्चने बुधवारी म्हटलं की सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांनी अनेक आठवड्यांपासून त्यांच्यावरील आरोपांवर पूर्ण मौन बाळगून आहेत. बुच यांनी अनेक आठवडे या आरोपांवर पूर्पपणे मौन पाळल्याचे हिंडेनबर्ग रिसर्चने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
"सिंगापूर स्थित खाजगी सल्लागार युनिट हे सेबी अध्यक्षा माधबी बुच यांच्या ९९ टक्के मालकीचे आहे. बुच याच्या पूर्णवेळ सदस्याच्या कार्यकाळात सेबीद्वारे नियमन केलेल्या अनेक सूचीबद्ध कंपन्यांकडून त्यांनी पेमेंट स्वीकारल्याचा ताजे आरोप समोर आले आहेत. यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, डॉ. रेड्डीज आणि पिडीलाइट या चार कंपन्यांचा समावेश आहे. तर बुच यांनी सिंगापूर-स्थित सल्लागार युनिटबाबत अद्याप कोणतेही तपशील दिलेले नाहीत," असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्याबाबत हिंडेनबर्ग यांनी केलेल्या खुलाशानंतर काँग्रेस आक्रमक झाला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा समूहाला सल्लागार सेवा पुरविणाऱ्या युनिटची सेबीच्या अध्यक्षा बुच यांच्याकडे ९९ टक्के भागीदारी असून आणि त्यांच्या पतीने यातून ४.७८ कोटी रुपये कमावल्याचे काँग्रेसने म्हटलं आहे. त्याचवेळी माधबी बुच महिंद्रा अँड महिंद्राशी संबंधित प्रकरणे निकालात काढत असल्याचा आरोपही काँग्रेस पक्षाने केला. दुसरीकडे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने धवल बुच यांना दिलेल्या पैशांवरुन हितसंबंधांचे आरोप फेटाळले आहेत. हे आरोप खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचे महिंद्राने म्हटलं.