>- मिलिंद गांगल, पनवेल
परवा बातमी वाचली कि अँबेसेडर ब्रँड हा प्युजो एस. ए. या फ्रेंच कंपनीने ऐंशी कोटी रुपयांना विकत घेतला, अन अँबेसेडर गाडी विषयीच्या आठवणी दाटून आल्या.
गाडी आणि गाडीची दुरुस्ती, गॅरेज या विषयाने पछाडले त्या काळात डोळ्या समोर तीनच प्रवासी वाहने होती. हिंदुस्थान मोटर्सची अँबेसेडर, प्रिमिअर ऑटोमोबाइल्सची पद्मिनी आणि महिंद्रा जीप. जीप बहुदा पोलिसांची किंवा कुटुंब नियोजनाची जाहिरात करणारी सरकारी गाडी, प्रीमिअर पद्मिनी एखाद्या डॉक्टर वकिलाची किंवा मुंबईतील काळी पिवळी टॅक्सी. पण अँबेसेडर मात्र पांढरी शुभ्र डौलदार अन वर लाल दिवा असेल तर अगदी तिच्या मालका सारखीच भारदस्त आणि तोऱ्यातली वाटायची.
वाढत्या वयासोबत गाडीचे आणि गाडी दुरुस्तीचे वेड ही वाढतच गेले अन जिज्ञासाही वाढली, मग वाचनही वाढत गेले. गाडीची दुरुस्ती शिकण्याकरता प्रत्येक्ष गॅरेज मध्ये काम शिकायला लागलो तेही अँबेसेडर वरच.
सी . के. बिर्ला ग्रुप स्वातंत्र्य पूर्व काळापासून गुजरात मधील पोर्ट ओखा मध्ये मॉरीस मोटर्स या ब्रिटिश गाड्यांचे असेम्बलिंग करत असे. १९५६-५७ च्या आसपास याच कंपनीने कलकत्त्याच्या जवळ उत्तरा पाडा भागात हिंदुस्थान मोटर्स नावाने गाड्या बनवण्याचा कारखाना सुरु केला. प्रथमतः ते लँड मास्टर नावाची गाडी तिथे बनवत असत १९५७ सालच्या आसपास त्या कंपनीने मॉरीस ऑक्सफर्ड या गाडीचे उत्पादन सुरु केले, त्या गाडीत १५०० सीसीचे चार सिलेंडर असलेले पेट्रोल इंजिन होते. १९५७ मॉडेलच्या मॉरीस ऑक्सफर्ड सिरीज III या गाडीच्या मूळ रचनेत काही महत्वाचे बदल करण्यात आले. जसे कि गाडीच्या अर्ध वर्तुळाकार असणाऱ्या मागचा भागात (Quarter Panels) टेल फिन्स जोडण्यात आल्या, बॉनेटच्या आकारात बदल करण्यात आला तसेच मूळचे साईड व्हॉल्व्ह असलेले इंजिन हेड बदलून त्या जागी ओव्हर हेड व्हॉल्व्ह (OHV) असलेले इंजिन हेड बसवण्यात आले. नवीन स्टेरिंग व्हील व लाकडी डॅश बोर्ड सहित ही गाडी वितरित करण्यात आली. गाडीच्या या सुधारीत आवृत्तीला नाव देण्यात आले अँबेसेडर मार्क १ आणि त्यावर बॅच चिटकवण्यात आला winged OHV.
खरं तर त्या काळा पासून अँबेसेडर ही भारतीय ऑटोमोबाईल विश्वाचा चेहराच झाली होती, मागे बसायला ऐस-पैस जागा, गाडीच्या बॉडी डिजाईनमध्ये असलेला डौल या मुळे ही गाडी राजकारण्यांची आवडती गाडी झाली, खरेतर त्या नंतरच्या काळात भारतीय राजकारण अन राजकारणी या गाडी शिवाय हलतच नसत (Politicians Prefered Car) ही गाडी थोरा मोठयांची स्टेटस सिम्बॉल ही झाली.
विविध रंगरूपात या गाडीने भारतीयांच्या मनात आपले मानाचे स्थान पक्के केले होते. भारतातल्या रस्त्यांची ती सम्राज्ञी झाली होती ह्या गाडीने फार वैभवाचा काळ पाहिला.
संगीत नाटकाच्या भरभराटीच्या आणि वैभवाच्या काळात ज्या प्रमाणे कथेची नायिका भरजरी शालू ,पैठणी, शेला ल्यालेली भामिनी, शकुंतला, सुभद्रा, देवयानी आणि शारदा बनत असे अगदी तसेच वैभव या गाडीलाही प्राप्त झाले होते, राजकारण्यांची शुभ्र वस्त्रांकित लाल दिव्यांचा तन्मणी परिधान केलेली सम्राज्ञी, मिलिटरीच्या जनरलची हिरवा शालू ल्यालेली नेव्हीच्या ऍडमिरलची काळी चंद्रकला नेसलेली तर पोलीस कमिश्नर व उच्च पदस्थांची धवल वस्त्रांकित सहचारिणी अश्या रूपात ती वावरली.
ऐस. टी महामंडळाच्या ताफ्यात तेव्हा एशियाड बसेस आलेल्या नव्हत्या तेव्हा तर मुंबई-पुणे टॅक्सी सर्व्हिसला अँबेसेडर शिवाय पर्यायच नव्हता. MONOCOQUE STRUCTURE (चासीस आणि बॉडी एकत्रित ) बांधणीची हि गाडी बसायला आरामदायी होती. स्टेरिंग कॉलम मध्ये गियर लिव्हर (STEERING GEAR) असल्याने ड्राइवर शेजारी बसायला मुबलक जागा या गाडीत होती. प्रामुख्याने ही गाडी (CHAUFFEUR DRIVEN) पगारी चालकाने चालवायची आणि मालकाने आरामात मागे बसण्यासाठी म्हणून प्रसिद्ध होती.
काळाची बदलणारी पावले या गाडीच्या निर्मात्यांनी ओळखली नाहीत अन जसे चल चित्र/बोलपट (PICTURE FILM -TALKIE) आल्यानंतर जी अवस्था संगीत नाटक अन नाटक कलावंतांची झाली तीच या गाडीचीही झाली.
भारतीय वाहन उद्योगात त्या वेळी काही प्रतिष्ठित घराण्याची मक्तेदारी निर्माण झाली होती स्पर्धा अशी नव्हतीच, ग्राहकाला गृहीत धरले गेले होते. उत्पादनाचा दर्जा सुमार होता, त्यात नावीन्य नव्हते अन ‘सरकार दरबारी परमिट राज’ पण तेव्हा अस्तित्वात होते.
गाडी खरेदी करण्याकरता ग्राहकाला नंबर लावून दोन-चार महिने वाट बघावी लागत होती, ग्राहक स्वतःचे पैसे खर्चून ‘याचक’ झाला होता आणि खात्रीदायक अशी विक्रीपश्च्यात्त सेवा उपलब्ध करून दिली जात नव्हती.
नेमके त्याच वेळी “संजय उवाच्य” म्हणून का असेना प्रवासी वाहन क्षेत्रात नवीन काही घडत होते. 'ग्राहक' केंद्र स्थानी मानून मध्यम वर्गाला परवडेल अशी जपानी तंत्रज्ञानावर आधारलेली छोटेखानी, वातानुकूलित (AIR CONDITIONED) १ लिटर पेट्रोल मध्ये १५ किलोमीटर हुन अधिक धावणारी आणि अँबेसेडरहुन कमी किंमत असलेली ' मारुती ८००' गाडी बाजारात आली, त्यांनी विक्री व विक्रीपश्चात सेवेचे (SALES & AFTER SALES SERVICES) जाळे निर्माण करायला सुरुवात केली आणि तिथेच अँबेसेडरची लोकप्रियता ओसरू लागली.
भारतीय वाहनव्यवस्थेचे तेव्हा "उत्तरायण" सुरु झाले. (उत्तरायण म्हणजे मारुती सुझुकीचा कारखाना उत्तरेत गुरगाव-हरयाणा येथे सुरु झाला होता.) अनेक परदेशी वाहन निर्माते भारतात पाय रोवत होते. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अँबेसेडर मध्ये प्रथम B.M.C. कंपनीचे १५०० सीसी चे असलेले डिझेल इंजिन बसवण्यात आले. भारतातली पहिली डिझेल इंजिन असलेली कार असा मानही या गाडीने मिळवला खरा. पण या B.M.C. कंपनीच्या इंजिनाची कामगिरीही सुमारच होती पण पेट्रोल व डिझेल इंधनाच्या किमतीतल्या मोठ्या तफावतीचा फायदा ग्राहकांना होत होता. मग या पुढे जाऊन अँबेसेडर ने १८०० सीसी चे इसुझू इंजिन आपल्या गाडीत बसवले पुढे बकेट सीट्स लावल्या, पूर्वी फक्त V.I.P गाडीत बसवत असलेले फ्लोअर शिफ्ट पद्धतीचे गियर लिव्हर आणि पॉवर स्टेरिंग सर्वसामान्यांच्या अँबेसेडर गाडीतही बसवले जाऊ लागले. २०१३ च्या आसपास BS-4 हे प्रदूषण नियंत्रणात असल्याचे मानांकन असलेले इंजिन आणि 5 स्पीड गिअर बॉक्स, नवीन बंपर्स व हेड लाईट व प्लास्टिक डॅश बोर्ड बसवण्यात आला, ( पण बॉडीच्या मूळ स्वरूपात मात्र काहीही मोठा बदल केला गेला नाही.) नवीन केलेल्या बदलांमुळे बाजारातील ओसरणारी लोक प्रियता मात्र या गाडीचे निर्माते थांबवू शकले नाहीत. २०१३-१४ या वाणिज्य वर्षात हिंदुस्थान मोटर्सने २५०० गाड्या सरकारी कार्यालये आणि टॅक्सी संघटनासाठी ( दिल्ली व कलकत्ता येथे ) विकल्या अन उत्पादन थांबवले.
अश्या रीतीने पाच दशकाहून अधिक काळ चाललेल्या “अँबेसेडर युगाचा” अस्त झाला.
सध्य स्थितीत जगातले सर्व अगरगण्य आणि नामांकित असे ब्रँड आधुनिक तंत्रज्ञान आणि सुख सोयींनी युक्त अशी आपली नव नवीन मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत सादर करीत आहेत. देशाच्या काना कोपऱ्यात आपली आलिशान वाहन विक्री दालने (DEALERSHIP ) तसेच सुस्थापित विक्री पश्चात सेवा उपलब्ध करून देत आहेत, तरी देखील भारतीयांच्या मनाचा आठवणींचा एक कोपरा अँबेसेडरने व्यापून ठेवला आहे. अँबेसेडरचे युग संपले तरी यादों कि बारात आजही मनात मात्र कायम आहे.
उत्पादन वर्षमॉडेलसब - मॉडेल
1954-1958हिंदुस्थान लॅण्डमास्टर – winged OHVसिरीज-३
1958-1962हिंदुस्थान अँबेसेडर मार्क-१
1962-1975हिंदुस्थान अँबेसेडर मार्क-२
1975-1979हिंदुस्थान अँबेसेडर मार्क-३
1979-1990हिंदुस्थान अँबेसेडर मार्क-४
1990-1999हिंदुस्थान अँबेसेडर डिझेल/पेट्रोल इंजिन नोवा
2000-2014हिंदुस्थान अँबेसेडर 1.8 ltr ISZ इंजिनग्रँड/क्लासिक/ऐंकॉर
“कालाय तस्मै नमः”
अँबेसेडरचे पोर्टर नावाचे स्टेशन वॅगन प्रकाराचे आणि कमर्शिअल (मालवाहू) प्रकाराचे मॉडेल देखील काही काळ उपलब्ध होते.