Join us

कपडे धुणे, अंघोळ महागात पडणार! साबण, पावडर सलग दुसऱ्या महिन्यात महागले, बडी कंपनी मेटाकुटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 6:41 PM

देश एका बाजूला कोरोना महामारीचा सामना करत असताना दुसरीकडे महागाईनं सर्वसामान्यांचं जगणं मुश्कील होऊ लागलं आहे. किरकोळ महागाईचा दर गेल्या सात महिन्यांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला आहे आणि रिझर्व्ह बँकेच्या लक्ष्याच्याही पलिकडे जाऊ पोहोचला आहे.

नवी दिल्ली-

देश एका बाजूला कोरोना महामारीचा सामना करत असताना दुसरीकडे महागाईनं सर्वसामान्यांचं जगणं मुश्कील होऊ लागलं आहे. किरकोळ महागाईचा दर गेल्या सात महिन्यांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला आहे आणि रिझर्व्ह बँकेच्या लक्ष्याच्याही पलिकडे जाऊ पोहोचला आहे. घाऊक महागाईचा दर तर कित्येक महिन्यांपासून १० टक्क्यांच्या वर पोहोचलेला आहे. यातच देशातील सर्वात मोठ्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक असलेल्या हिंदुस्तान युनिलीव्हर लिमिटेडनं (HIL) या वर्षात दुसऱ्यांदा साबण आणि सर्फच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर इतर कंपन्या देखील उत्पादनांच्या किमतीत वाढ करण्याची दाट शक्यता आहे. साबण आणि सर्फच्या किमतीत सलग दुसऱ्यांदा दरवाढ झाल्यानं सर्वसामान्यांच्या तोंडाला फेस आला आहे. 

मार्केट अनालिस्ट फर्म Edelweiss च्या माहितीनुसार हिंदुस्थान युनिलिवर कंपनीनं या महिन्यात सर्फ आणि साबणाच्या किमतीत ३ ते १० टक्क्यांची वाढ केली आहे. कंपनीनं याआधी गेल्याच महिन्यात साबण आणि सर्फच्या किमतीत दरवाढ केली होती. हिंदुस्थान युनिलीवर कंपनी लक्स, रेक्सोना, पॉण्ड्स, सर्फ एक्सल, विम बार यांसारख्या लोकप्रीय उत्पादनांची विक्री करते. ही उत्पादनं देशातील प्रत्येक घराघरात वापरली जातात. या महिन्यात लक्स, रेक्सोना, पॉण्डस आणि सर्फ एक्सलचे दर वाढविण्यात आले आहेत. 

"आमच्या चॅनल चेकमधून दिसून येतं की सर्फ एक्सल ईझी वॉश, सर्फ एक्सल क्विक वॉश, विम बार अँड लिक्विड, लक्स, रेक्सोना, पॉण्ड्स पावडरसह अनेक उत्पादनाच्या किमतीत वाढ झाली आहे. कंपनीनं गेल्याच महिन्यात व्हील डिटर्जंट, पिअर्स साबण आणि सर्फ एक्सलच्या किमतीत वाढ केली होती", असं Edelweiss Finacial Services चे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अविनाश रॉय यांनी सांगितलं. 

हिंदुस्थान युनिलीव्ह कंपनी गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून जवळपास दर महिन्याला उत्पादनांच्या किमतीत वाढ करत आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये कंपनीनं १ किलोच्या व्हील डिटर्जंटच्या किमतीत ३.४ टक्के दरवाढ केली होती. डिसेंबरमध्ये कंपनीनं लाइफबॉय साबण, लक्स साबण, सर्फ एक्सल डिटर्जंट साबण आणि रिन डिटर्जंट साबणाच्या किमतीत ७ ते १३ टक्क्यांनी वाढ केली होती. 

Edelweiss नं केलेल्या आकलनानुसार, ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत हिंदुस्थान युनिलीवरची उत्पादनं वार्षिक पातळीवर ८ टक्क्यांनी महागली आहेत. अर्थात कंपनीच्या उत्पदानांच्या किमतीत वाढ झाल्यानंतरही त्याचा विक्रीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचं दिसून आलं होतं. सर्फ आणि साबण विक्रीत आताही हिंदुस्थान युनिलीवर कंपनीचा दबदबा कायम आहे. 

टॅग्स :महागाईव्यवसाय