नवी दिल्ली : कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेमधून (ईपीएस) वाढीव निवृत्तीवेतनाबाबत अद्यापही संभ्रम आहे. ते कसे मिळवायचे, हा एक मूळ प्रश्न कायम असून, या संदर्भात कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) एक परिपत्रक जारी करून, तीन मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले आहे. अर्जामध्ये दिलेली माहिती आणि ईपीएफओकडील माहितीमध्ये तफावत आढळल्यास किंवा कंपनीने अर्ज फेटाळल्यास दुरुस्तीची संधी देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
एखादा कर्मचारी पेन्शन याेजनेत जास्त योगदान देत असेल आणि सप्टेंबर १, २०१४ पूर्वी सेवानिवृत्त झाला असेल, किंवा १ सप्टेंबर २०१४ रोजी हाेणारे सदस्य आणि उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्याची संधी गमाविणारे सदस्य या याेजनेसाठी पात्र ठरतील.
वेळेत माहिती न आल्यास काय?
अशा स्थितीत कंपनीस एक महिन्याची मुदत दिली जाईल. या मुदतीत माहिती सादर झाल्यास किती रक्कम भरायची याची माहिती दिली जाईल. या मुदतीत माहिती न आल्यास ईपीएफओ गुणवत्तेनुसार, आदेश निर्गमित करील.
३ मेपर्यंत सादर करा अर्ज
वाढीव पेन्शनसाठी कर्मचारी व कंपनी
यांचा संयुक्त अर्ज ३ मे, २०२३ पर्यंत ईपीएफओकडे सादर करता येऊ शकेल. ही मुदत आता संपत आली असून कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर निर्णय घेणे अपेक्षित आहे.
या तीन मुद्द्यांवर ईपीएफओने खुलासा केला आहे
वाढीव पेन्शनसाठी संयुक्त अर्ज सादर केल्यानंतर पुढे काय?
ईपीएफओ अर्जाची छाननी करेल. कंपनीने सादर केलेला वेतन तपशील ईपीएफओकडील तपशिलाशी जुळवून पाहिला जाईल. वाढीव पेन्शनसाठी कर्मचाऱ्याने किती रक्कम भरावयाची याचा हिशेब काढला जाईल व ही रक्कम भरण्यास सांगितले जाईल.
संयुक्त अर्जात त्रुटी असल्यास काय?
कंपनी व कर्मचारी यांनी सादर केलेला तपशील आणि ईपीएफओकडील तपशील यात तफावत आढळल्यास अचूक तपशील सादर करण्यास सांगितले जाईल. त्यासाठी एक महिन्याचा अवधी दिला जाईल.
कंपनीने संयुक्त अर्जास मान्यता दिली नाही तर काय?
कंपनीने संयुक्त अर्ज फेटाळल्यास कंपनीस अतिरिक्त पुरावे अथवा चुका (कर्मचारी अथवा निवृत्तांच्या चुकांसह) दुरुस्त करण्याची संधी दिली जाईल. त्यासाठी १ महिन्याची मुदत दिली जाईल. तशी माहिती कंपनी व कर्मचारी दोघांनीही कळविली जाईल.
या परिपत्रकात पुढील तीन प्रश्नांचा उल्लेख
कंपनी आणि कर्मचारी यांनी वाढीव पेन्शनसाठी संयुक्त अर्ज सादर झाल्यानंतर पुढे काय?
संयुक्त अर्जात त्रुटी असल्यास काय?
कंपनीने संयुक्त अर्जास मान्यता दिली नाही तर काय?