Join us

'रसगुल्ला'नं संपूर्ण आयुष्य बदललं; एका व्यक्तीनं चक्क कोट्यवधीची संपत्ती कमावली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 2:44 PM

बऱ्याच जणांचे स्वप्न उद्योगधंद्यात उतरण्याचे असते, मात्र काही मोजकेच व्यवसाय करण्याचं धाडस करतात आणि त्यात यशस्वीही होतात. 

प्रयागराज - उत्तर प्रदेशमधील प्रयागराज शहर केवळ नद्यांचा संगम आणि एज्युकेशन हबसाठी ओळखलं जात नाही तर या शहरातील खाद्यसंस्कृतीनेही अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. याठिकाणची नेतरामची चवदार आणि मसालेदार कचोरी खाल्यानंतर लोक तोंड गोड करण्यासाठी शहरातील देहाती रसगुल्ले खायला गर्दी करतात. या चविष्ट रसगुल्लाचा आस्वाद घेतल्यास तुम्हीही त्याचं कौतुक कराल. 

प्रयागराजमधील खाद्यप्रेमींसाठी लोकनाथ आणि बैरहना परिसर पसंतीचा आहे. लोकनाथ इथं रबडी लस्सी तिथला ट्रेड मार्क बनलीय तर बैरहना येथील देहाती रसगुल्ला खाऊन तर अनेकजण तृप्त होतात. ३९ वर्षीय जुन्या रसगुल्ला विकणाऱ्या दुकानासमोर संध्याकाळ होताच लोकांच्या रांगा लागतात. देहाती नावाचं हे दुकान कसं सुरू झालं हेदेखील रंजक आहे. 

कसं पडलं देहाती रसगुल्ला नाव?

प्रयागराजच्या बैरहना भागात ३९ वर्षापूर्वी दूधाचा धंदा करणाऱ्या राम स्वरुप यादव यांनी छोटंसं मिठाईचं दुकान उघडलं. या दुकानात बनवलेले रसगुल्ले लोकांच्या पसंतीस पडू लागले. कमी गोड, शुद्ध आणि स्वादिष्ट रसगुल्ल्याने अनेकांच्या तोंडाला पाणी सुटत होते. त्यामुळे रसगुल्ल्याची वाढती क्रेझ पाहून रामस्वरुप यांनी इतर मिठाई विक्री बंद करत केवळ रसगुल्ला विक्रीवर जास्त लक्ष केंद्रीत केले. पाहता पाहता रामस्वरुप यांच्या दुकानातील रसगुल्लाची मागणी वाढली. विक्री तर वाढली परंतु त्याला ओळख मिळणे गरजेचे बनले. रामस्वरुप यादव यांचे चिरंजीव अजय यादव सांगतात की, माझ्या पप्पाचे मित्र त्यांना प्रेमाने देहाती बोलवायचे कारण ते देहातमधून आले होते. त्यामुळे आपली ओळख त्यांनी रसगुल्ल्याला दिली. आता प्रयागराजमधील देहाती रसगुल्ला एक ब्रँड बनला आहे.

रसगुल्ला इतका चवदार का?

खाद्याची रुचकर चव जिभेला पटवून देणं ही सोपी गोष्ट नाही आणि तीही रसगुल्ल्यांच्या स्पर्धेत जिथे चवीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अशा स्थितीत प्रयागराजमधील लोकांच्या पसंतीमध्ये देहाती रसगुल्ला कसा काय उतरला? याबाबत रसगुल्ला विक्री करणारे दुकानदार विजय यादव सांगतात की, रसगुल्ला साधारणपणे ३ गोष्टींच्या मिश्रणातून बनवला जातो. पहिला खवा, दुसरं साखर आणि तिसरा मैदा. या तिन्हींच्या मिश्रणाचे प्रमाण आणि मिसळण्याची शैली यामुळे त्याची चव वेगळी होते. रसगुल्ला बनवताना त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याशी तडजोड करत नाही. रसगुल्ल्यामध्ये ते स्वतः बनवलेला किंवा विश्वासू लोकांकडून विकत घेतलेला खवा वापरतात. जर ते इतर ठिकाणाहून खवा विकत घेत असतील तर त्याची चव तपासण्यासाठी ते त्याची चाचणी घेतात असं त्यांनी सांगितले.

वर्षाला ७५ लाखांची उलाढाल

एकेकाळी केवळ १ रुपयाला विक्री होणारा रसगुल्ला आता दूध आणि इतर वस्तूंचे भाव वाढल्याने महागला आहे. एका देहाती रसगुल्लाची किंमत २० रुपये आहे. सामान्य रसगुल्ल्यापेक्षा हा दुप्पट आकाराचा असतो. याठिकाणी दिवसाला ३-४ हजार रसगुल्ले विकले जातात. देहाती रसगुल्ला दुकानाचा वार्षिक टर्नओव्हर जवळपास ७५ लाखांचा आहे. देहाती रसगुल्ला खाण्यासाठी केवळ प्रयागराज नाही तर इतर शहरातून चाहते येतात. यातूनच यादव कुटुंबाने कोट्यवधीची संपत्ती आज कमावली आहे. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी