Join us

गुंतवणूकदारांना फटका?; शेअर बाजार १५ ते २० टक्के खाली जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 6:44 AM

गतसप्ताहामध्ये जाहीर झालेल्या पतधोरणाने रिझर्व्ह बँकेने आपण देशांतर्गत परिस्थितीला अधिक प्राधान्य देत असल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.

प्रसाद गो. जोशी इंधनाच्या वाढत्या किमती व अन्य कारणांनी जगभरामध्ये चलनवाढीची शक्यता वर्तविली जात असून, त्याचा परिणाम शेअर बाजारामध्ये करेक्शन येण्यामध्ये होऊ शकतो. बाजार १५ ते २० टक्के खाली जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आगामी सप्ताहामध्ये काही कंपन्यांचे निकाल व जागतिक परिस्थिती यावर बाजाराची दिशा ठरण्याची शक्यता दिसते. 

गतसप्ताहामध्ये जाहीर झालेल्या पतधोरणाने रिझर्व्ह बँकेने आपण देशांतर्गत परिस्थितीला अधिक प्राधान्य देत असल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. या धोरणामुळे भारतातील चलनवाढ रोखण्यासाठी केवळ व्याजदरवाढ हाच उपाय केला जाणार नाही. त्यामुळे चलनवाढीचा दरही काहीसा कमी होऊ शकतो. त्यामुळे देशाच्या औद्योगिक वाढीलाही हातभार लागणे शक्य आहे. असे असले तरी अर्थव्यवस्थेच्या विकासदराबाबत रिझर्व्ह बँकेने काहीसा सावध पवित्रा घेतलेला दिसतो. परकीय वित्तसंस्थांकडून बाजारातील विक्रीचा धडाका कायम आहे. गतसप्ताहामध्ये या संस्थांनी ५६४१.८१ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. 

गुंतवणूकदारांचे ३.८१ लाख कोटी बुडाले गतसप्ताहामध्ये बाजारामध्ये अस्थिर वातावरण राहिल्याने निर्देशांक खाली आले. बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकामध्ये ०.८३ टक्क्यांनी घट झाली. यामुळे शेअर बाजाराचे भांडवलमूल्य ३,८१,३९२.३९ कोटी रुपयांनी कमी होऊन २,६३,८९८८६.३५ कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे.  बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान कागदोपत्री असले तरी दोन सप्ताहांच्या वाढीनंतर झालेली घसरण गुंतवणूकदारांमध्ये निराशा निर्माण करू शकते.

टीसीएसला सर्वाधिक फटकाबाजारातील दहा अव्वल आस्थापनांपैकी टीसीएसमध्ये सर्वाधिक घट झाली. त्यापाठोपाठ एचडीएफसी, हिंदुस्थान युनिलीव्हर, लार्सन ॲण्ड टुब्रो यांचा क्रमांक लागतो. याचवेळी रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील आणि मारुती यांच्या भांडवलमूल्यामध्ये वाढ झालेली दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार