नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आल्यानंतर बँकांनीही आपल्या व्याज दरात घट केली आहे. व्याजदर कमी झाल्याने साहजिकच सामान्य माणसांना मोठा दिलासा मिळणार आहे. जर तुम्ही घर किंवा गाडी घेण्याचा विचार करत असाल तर आधीच्या तुलनेत आता तुमच्या बजेटला थोडा दिलासा मिळणार आहे.
देशातील सर्वात मोठी असलेली स्टेट बॅंक ऑफ इंडियासह 6 मोठ्या बॅकांनी आपल्या व्याजदरात घट केली आहे, त्यामुळे गृहकर्ज आणि वाहनकर्जावर व्याज दर कमी होणार आहे. एसबीआयकडून बॅंकेच्या व्याजदरात 0.05 टक्के घट केली आहे. तसेच 30 लाख रुपये गृहकर्जावरील व्याजावर 0.10 टक्के घट करण्यात आली आहे. एसबीआयने 8.55 टक्के व्याजदरात 0.05 इतकी कपात करत 8.50 टक्के व्याजदर लागू केलेत. यानुसार नवा व्याजदर 8.60 ते 8.90 टक्क्यांपर्यत असेल. रिझर्व्ह बँकेने अलिकडेच आपल्या रोपो दरात पाव टक्क्यांची कपात केलीय. या कपातीनंतर एसबीआयने आपल्या व्याजदरात कपात केली आहे.
एसबीआयच्या आधी इंडियन ओव्हरसीज बँकेनेही व्याजदर कपात केली आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेने एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधी असलेल्या कर्जांवरील व्याजदरात 0.05 टक्के इतकी कपात केली आहे. यानुसार बँकेचा व्याजदर 8.70 वरुन 8.65 टक्क्यावर आला आहे. तर दोन ते तीन वर्षावरील कर्जाचे व्याजदर अनुक्रमे 8.75 टक्के आणि 8.85 टक्के असेल. मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेटवरुन बॅंक आपले व्याजदर कमी-जास्त करत असते.
आयसीआयसीआय बॅंक मागील काही दिवसांपूर्वी आयसीआयसीआय बॅँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग(एमसीएलआर) या दरात 5 बेसिक पॉँइटने कमी करण्यात आले होते. तर दोन महिन्यांच्या कालावधीसाठी एमसीएलआर दर 8.55 टक्के आहे. त्यामुळे गृहकर्जावरील व्याजदर पूर्वीच्या तुलनेत स्वस्त झाले आहे.
कोटक महिंद्रा बँक कोटक महिंद्रा बॅंकनेही एमसीएलआर दरात 10 बेस पॉंईटने कपात केली आहे. बँकेने एक वर्षाच्या कालावधीसाठी एमसीएलआर दर 8.90 टक्के ठेवले आहेत तर दोन वर्ष आणि तीन वर्ष या कालावधीसाठी एमसीएलआर दर 9 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.
एचडीएफसी बॅँक एचडीएफसी बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट(एमसीएलआऱ) दरात 0.10 टक्के कपात केली आहे. बँकेने एक वर्षाच्या कालावधीत कर्जासाठी एमसीएलआर दर 8.75 टक्क्यांहून 8.65 टक्के केला आहे. बँकेने 6 महिने, 3 महिने आणि 1 महिन्यासाठी एमसीएलआर दर अनुक्रमे 8.45 टक्के, 8.35 टक्के आणि 8.30 टक्के केले आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रबँक ऑफ महाराष्ट्रने 5 एप्रिल रोजी कर्जावरील व्याजदरात 0.05 टक्के कपात केली आहे. यावर्षी बँक ऑफ महाराष्ट्रने एमसीएलआर दरात घट करत 8.75 टक्क्यांवरुन 8.70 टक्के केले आहे. त्याचसोबत सहा महिने, तीन महिने आणि एक महिने यासाठी अनुक्रमे 8.50 टक्के, 8.45 टक्के आणि 8.25 टक्के असा एससीएलआर दर केला आहे. त्यामुळे ग्राहकांना व्याजदरात दिलासा मिळाला आहे.