लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशातील घरांच्या मागणीमध्ये वाढ होत असून, नुकत्याच संपलेल्या वर्षामध्ये देशातील सात प्रमुख शहरांमध्ये घरांची विक्री ७१ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, अद्यापही कोविडपूर्व पातळीपेक्षा ही विक्री १० टक्क्यांनी कमी आहे. हैदराबाद शहरामध्ये गृहविक्री तीन पटींनी वाढली आहे. त्याच वेळी मुंबई शहरात ७२, तर पुण्यामध्ये ५३ टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे.
एनारॉक या कंपनीने देशातील सात शहरांमधील गतवर्षातील घरांच्या विक्रीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार या वर्षभरामध्ये २,३६,५३० घरांची विक्री झाली आहे. असे असले तरी अद्यापही हा आकडा कोविडपूर्व स्तरापेक्षा १० टक्क्यांनी कमीच असल्याचे एनारॉकचे चेअरमन अनुप पुरी यांनी सांगितले. सन २०१९मध्ये २,६१,३५८ घरांची विक्री झालेली होती. सन २०२२ हे गृहविक्रीसाठी चांगले वर्ष राहण्याचे संकेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सन २०२१ मध्ये मुंबई, दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, हैदराबाद, पुणे, बंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता या सात प्रमुख शहरांमधील घरांच्या विक्रीबाबतची आकडेवारी आणि त्यामधून निघणारे निष्कर्ष एनारॉक या कंपनीने जाहीर केले आहेत. त्यानुसार हैदराबाद शहरामध्ये मागील वर्षाच्या तुलनेमध्ये घरांच्या विक्रीमध्ये तीन पट (३०० टक्के) अशी सर्वाधिक वाढ झाली आहे.
२०२१मध्ये येथे २५,४१० (आधीच्या वर्षी ८५६०) घरांची विक्री झाली आहे. मुंबई शहरामधील वाढ ही सुमारे ७२ टक्के आहे.
सन २०२०मध्ये येथे ४४,३२० घरे विकली गेली होती. गतवर्षामध्ये ७६,४०० घरांच्या विक्रीची नोंद झाली आहे. पुणे शहरामध्ये वाढीचे प्रमाण ५३ टक्के आहे. सन २०२०मध्ये विकल्या गेलेल्या घरांची संख्या २३,४६० होती ती गतवर्षामध्ये वाढून ३५,९८० वर पोहोचली आहे.
ही आहेत
वाढीची कारणे...
n स्वत:चे घर असावे, अशी मनीषा असणाऱ्यांची वाढलेली संख्या
n गृहकर्जावरील कमी झालेले दर
n कोविड काळामध्ये कमी झालेले वेतन पुन्हा पूर्वीच्याच पातळीवर आल्यामुळे वाढलेला आर्थिक स्तर
n महाराष्ट्रासह काही राज्यांनी दिलेली मुद्रांक शुल्कातील सवलत
n बिल्डरांकडून मिळत असलेल्या काही सवलती
n विभक्त कुटुंब पद्धती तसेच नोकरी, व्यवसायामुळे वेगवेगळी राहणारी मुले