बदलापूर : काही वर्षात सिमेंट, स्टील आणि इतर बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्याने बदलापुरातील बिल्डर असोसिएशनने प्रति चौरस फूट ५०० रुपयांपर्यंत घरांच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेतला होता. याची कल्पना ग्राहकांना आल्यानंतर अवघा एका महिन्यात तब्बल ८०० ते १००० ग्राहकांनी बदलापुरात घर खरेदी केले आहे, असा दावा नेरेडको संघटनेचे पदाधिकारी संभाजी शिंदे यांनी केला आहे.घरे महागण्याआधीच अनेक ग्राहकांनी बदलापुरात घर खरेदीसाठी बुकिंग केले. एवढेच नव्हे तर मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तब्बल आठशे ते हजार घरांची बुकिंग या भाववाढीच्या घोषणेनंतर झाल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. काही बांधकाम व्यावसायिकांनी २०० तर काही बांधकाम व्यावसायिकांनी ४०० ते ५०० रुपयांची दरवाढ केली. ही दरवाढ बांधकामाचा दर्जा योग्य राखण्यासाठी केल्याचा दावा संघटनेने केला होता. बांधकाम साहित्यांचा दर वाढत असताना वाढलेल्या दराप्रमाणे बांधकाम करणे शक्य होत नव्हते. अशा परिस्थितीत अनेक बांधकाम व्यावसायिक आपला नफा टिकवण्यासाठी कामाचा दर्जा घसरण्याची शक्यता होती. त्यामुळेच बांधकामाचा दर्जा न घसरू देता काही प्रमाणात किमतीत वाढ करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता, असे मत संघटनेचे अध्यक्ष अजय ठाणेकर यांनी स्पष्ट केले आहे. त्या निर्णयाचेही अंबरनाथ आणि बदलापूर येथील ग्राहकांनी स्वागत केले. अंबरनाथ आणि बदलापुरात केवळ घर नव्हे तर दर्जेदार घर खरेदी करणाऱ्यांचा ओघ वाढत असल्याचे मत ठाणेकर यांनी स्पष्ट केले.
बदलापुरात ‘नेरेडको’तर्फे गुरुवारपासून गृहप्रदर्शन बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूरमधील बांधकाम क्षेत्रातील नावारूपाला आलेल्या गृहसंकुलांचे प्रदर्शन बदलापूर आणि अंबरनाथच्या मध्यावर असलेल्या क्रीडासंकुलात भरविण्यात आले आहे. ‘नेरेडको’ या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेच्या अंबरनाथ आणि बदलापूर शाखेतर्फे १४ ते १७ एप्रिल या कालावधीत हाेणारे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.नेरेडको या संघटनेच्या अंबरनाथ आणि बदलापूर शाखेतर्फे पहिल्यांदाच गृह प्रदर्शन भरणार आहे. या गृहप्रकल्पात ४० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांनी सहभाग नोंदविला आहे. २० लाखांपासून ६० लाखांपर्यंतचे घर या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. तसेच गृह प्रदर्शनाच्या चार दिवसांत प्रत्येक बांधकाम व्यावसायिक विशेष सवलत देणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अजय ठाणेकर यांनी सांगितले. ग्राहकांना एकाच ठिकाणी अनेक पर्यायांतून आपल्या स्वप्नातील घरखरेदी करणे सोपे होणार आहे. या प्रदर्शनात अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक गृहप्रकल्प सादर करणार आहेत. ४० स्टॉलमध्ये तब्बल दीडशेहून अधिक गृहप्रकल्पांची माहिती ग्राहकांना मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
व्हिजन डाॅक्युमेंटरीचे करणार प्रक्षेपणशासन आणि ग्राहक यांच्यातील दुवा बनवण्याचे काम या संघटनेने हाती घेतले आहे. त्याच अनुषंगाने अंबरनाथ आणि बदलापूर शहर भविष्यात कसे राहणार, याचे व्हिजन डॉक्युमेंटरी तयार करण्यात आले आहे. त्या डॉक्युमेंटरीचे प्रक्षेपणही करण्यात येणार आहे. बदलापूर शहर आणि अंबरनाथ शहर भौगोलिकदृष्ट्या एकत्रित असल्याने शासन या दोन्ही शहरांना विकसित शहराच्या अनुषंगाने योग्य प्रकारे मूलभूत सुविधा पुरवत असल्याचे संघटनेचे पदाधिकारी संभाजी शिंदे यांनी स्पष्ट केले.