तुम्हीही जर नवं घर घेण्याचा विचार करत असाल तर उशीर करू नका. कारण स्वस्त व्याज दराचे दिवस आता संपणार आहेत. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेवर व्याजदरात वाढविण्याचासाठी दबाव देखील तितकाच वाढत आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये आरबीआयकडून रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. सध्या गृहकर्जाचे व्याज दर गेल्या १० वर्षांच्या सर्वात निच्चांकी पातळीवर आहेत. रिझर्व्ह बँकेनं गेल्या दोन वर्षांपासून व्याज दर वाढीवर लगाम घालून ठेवलेला आहे. पण ही फक्त काही दिवसांची गोष्ट आहे. एप्रिल किंवा जून महिन्यात रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ केली जाऊ शकते.
महागाई आणि इतर मायक्रो इकोनॉमिक परिस्थितीमुळे दबाव वाढतो आहे. त्यामुळे जर तुम्ही घर घेण्याच्या विचारात असाल तर गृहकर्ज घेण्यासाठी सध्याची योग्य संधी आहे. कारण आगामी काळात रिझर्व्ह बँकेकडून व्याज दरात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गेल्या ८ वर्षांच्या तुलनेत उच्चांकावर पोहोचल्या आहेत. कच्च्या तेलाचा प्रतिबॅरेल दर १०० डॉलरच्या पार पोहोचला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. कारण एकूण गरजेच्या खूप मोठा वाटा तेल भारत आयात करतो. कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर प्रतिबॅरलच्या पार पाहिला तर पेट्रोल आणि डिझेल महाग होण्याशिवाय पर्याय नाही. अशात बँकांकडून व्याज दरात वाढ केली जाऊ शकते. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.