Join us

रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात; बँकांचे हप्ते कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 12:06 PM

रेपो रेट 6.50 टक्क्यांवरुन 6.25 टक्क्यांवर

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे रेपो रेट 6.25 टक्क्यांवर आला आहे. रेपो रेटमध्ये कपात करण्यात आल्यानं गृह कर्जधारकांना दिलासा मिळू शकतो. यासोबतच विविध प्रकारची कर्जही स्वस्त होऊ शकतात. रिझर्व्ह बँकेनं गेल्या तीन पतधोरणांमध्ये रेपो रेट बदलला नव्हता. 2020 मध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नात 7.4 टक्क्यांची वाढ होईल, असा अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला. रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये कपात केल्यानं रिव्हर्स रेपो रेट 6 टक्क्यांवर आला. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीत 6 सदस्य आहेत. त्यातील 4 सदस्यांनी रेपो रेटमध्ये घट करण्याच्या बाजूनं मतदान केलं. मार्चपर्यंत महागाईचा दर 2.8 टक्के इतका राहील, असा आरबीआयचा अंदाज आहे. तर एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत महागाईच्या दरात वाढ होऊन तो 3.4 टक्के इतका होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात रेपो रेटमध्ये आणखी कपात होण्याची दाट शक्यता आहे. आरबीआयनं रेपो रेटमध्ये बदल केल्यानं कर्ज स्वस्त होणार आहेत. यामध्ये सर्व प्रकारच्या कर्जांच्या समावेश असेल. 28 जानेवारीला आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सर्व सरकारी बँकांच्या प्रमुखांची बैठक घेतली होती. त्यात त्यांनी रेपो रेटमध्ये कपात करण्याचे संकेत दिले होते. सरकारी बँकांनी दिलेली कर्ज मोठ्या प्रमाणात बुडित खात्यात गेली आहेत. त्यामुळे 11 बँकांची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे त्वरित सुधारणा करण्याचे आदेश आरबीआयनं या बँकांना दिले आहेत. या बँकांना नव्या कर्जांचं वाटप करण्यास आणि नव्या शाखा सुरू करण्यास आरबीआयनं मज्जाव केला आहे. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँक