मुंबई : देशभरात मागील वर्षी घरांच्या किमतीत मोठी घट झाल्याचा एक अहवाल आला असून, २०१६ची नोटाबंदी, त्यानंतर रेरा व जुलैपासून लागू झालेला जीएसटी ही त्याची कारणे असल्याचे त्यात म्हटले आहे. नाईट फ्रॅन्क इंडिया संस्थेचा हा अहवाल आहे. या अहवालानुसार, भारतात घरांच्या किमतीत सरासरी तीन टक्के घट झाली. मुंबईत ही घट ५ टक्के राहिली. सर्वाधिक घट पुण्यात ७ टक्के झाली. दिल्लीच्या राष्टÑीय राजधानी क्षेत्रातील (एनसीआर) घरांचे दर मागील सहा वर्षांपासून सातत्याने घसरत असतानाच २०१७ मध्ये त्यात आणखी दोन टक्क्यांची घट झाली.मूळात सुरुवातीला नोटाबंदीमुळे बाजारातील आर्थिक तरलता संपली. त्यानंतर रेरामुळे एकूणच या क्षेत्रावर निर्बंध आले. तर जीएसटीमुळे घरांवरील कर वाढला. या तिन्हीचा परिणाम होऊन देशभरातील रिअल इस्टेट क्षेत्रातील मागणीत प्रचंड घट झाली. त्यातून घरांचे दर घसरू लागले आहेत.मुंबई आणि पुण्यातही दरांत घसरण झाली असली तरी त्याची कारणे वेगळी आहेत. या दोन्ही शहरांमधील घरांच्या मागणीत अनुक्रमे तीन आणि पाच टक्के वाढ दिसून आली. तरिही दरांत घसरण झाल्याचे प्रमुख कारण रेरा ठरले आहे. रेराच्या कडक अंमलबजावणीमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात शिस्त आली व त्यातून फुगलेले दर कमी झाले, असे अहवालाचे म्हणणे आहे.परवडणारी घरे वाढलीअफोर्डेबल अर्थात स्वस्त घरांची मागणी सलग दोन वर्षे वाढत असल्याचे दिसून आले आहे. देशभरातील एकूण घरांपैकी २०१६ मध्ये ५३ टक्के घरे ही ‘अफोर्डेबल हाऊसिंग’(परवडणारी घरे) मध्ये होती. हा आकडा २०१७ मध्ये ८३ टक्क्यांवर गेला. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत या घरांना अनुदान मिळत असल्याने विकासकही अधिकाधिक अशी घरे व फ्लॅट्स बांधत असल्याचे समोर आले आहे.
घरांच्या किमतीत पाच टक्के घट? नाईट फ्रॅन्कचा अहवाल; जीएसटी, नोटाबंदी, रेराचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 2:36 AM