नवी दिल्ली : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे गृहनिर्माण क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. एप्रिल ते जून या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये देशातील नऊ प्रमुख शहरांमध्ये घरांच्या विक्रीमध्ये तब्बल ६७ टक्क्यांची घट झाली आहे. मागील वर्षाच्या याच तिमाहीशी तुलना करता ही घट झालेली दिसून येत आहे.
प्रॉफइक्विटी या संस्थेने देशातील प्रमुख नऊ शहरांमधील घरांच्या विक्रीबाबत अभ्यास केला. त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. या तिमाहीमध्ये
२१,२९४ घरांची विक्री झाली आहे. मागील वर्षी ही विक्री ६३,३७८ एवढी होती. नोएडा हे शहरवगळता अन्य आठ शहरांमध्ये घरांची विक्री कमी झाली आहे. गुरुग्राममध्ये विक्रीमध्ये ७९१ टक्के अशी प्रचंड घट झाली आहे. चेन्नई आणि हैदराबाद येथे ७४, तर बेंगळुरू येथे ७३ टक्क्यांनी विक्री घटली आहे. मुंबईमध्ये ६३ टक्के, पुण्यामध्ये ७० टक्के तर ठाण्यामध्ये ५६ टक्के घरांची विक्री कमी झाली आहे.
या आठ शहरांमधील घरांच्या विक्रीमध्ये झालेली घट ही ८१ टक्के असल्याचे अहवालात म्हटले आहे. नोएडामध्ये मात्र घरांची विक्री वाढली आहे. येथे मागील वर्षी ११२३ घरे विकली गेली होती. यंदा ही संख्या ११७७ आहे.
मुंबईमधील किमती ३० टक्क्यांपर्यंत कमी
अन्य एका सर्वेक्षणानुसार पुण्यामध्ये जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या काळामध्ये घरांच्या विक्रीमध्ये २३ टक्क्यांनी घट झाली आहे. कोरोनाच्या प्रसारासाठी केलेले लॉकडाऊन हे यासाठीचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.
मुंबईमधील गृहबांधणी प्रकल्पांमध्ये घरे तयार आहेत मात्र खरेदीदारच नसल्याने या प्रकल्पांचे विकासक अडचणीमध्ये आले आहेत. गेल्या वर्षभरामध्ये येथील घरांच्या आणि जागेच्या किमती २५ ते ३० टक्क्यांपर्यंत खाली आल्या असल्या तरी अद्याप खरेदीला म्हणावी तशी गती आलेली नाही. मध्य मुंबईमध्ये विकासकांना भांडवलाची गरज असून, ते मिळविण्यासाठी ते धडपडत आहेत. ठाण्यासारख्या शहरामध्ये घरांची संख्या जास्त असल्यामुळे ग्राहक मिळत नसल्यामुळे जागांच्या किमती कमी करून त्यांची विक्री करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नवी मुंबईमध्ये घरांवरील डिस्काउण्ट कमी होत आहे. जसजसे आपण पश्चिमेकडील उपनगरांकडे जाता, तसतशी किमती वाढताना दिसत आहेत.
तिमाहीत गृहविक्रीमध्ये झाली ६७ टक्के घट, देशातील नऊ शहरांची स्थिती
प्रॉफइक्विटी या संस्थेने देशातील प्रमुख नऊ शहरांमधील घरांच्या विक्रीबाबत अभ्यास केला. त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 03:43 AM2020-07-11T03:43:26+5:302020-07-11T03:43:32+5:30