Join us

घरविक्रीचा विक्रम मोडला; महामुंबई अव्वल स्थानावर, तिसऱ्या क्रमांकावर पुणे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 10:07 AM

२०२२ या वर्षात १ लाख १० हजार घरांच्या विक्रीसह महामुंबईने देशात विक्रीचा उच्चांक गाठला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: २०२२ या वर्षात १ लाख १० हजार घरांच्या विक्रीसह महामुंबईने देशात विक्रीचा उच्चांक गाठला आहे, तर सरत्या वर्षाचे वैशिष्ट्य म्हणजे सन २०१४ नंतर प्रथमच एका वर्षात महामुंबई, एनसीआर, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई या सात शहरांमध्ये घरांची विक्रमी विक्री झाल्याची माहिती एका अग्रगण्य बांधकाम उद्योगाने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

एकीकडे घरांच्या विक्रीमध्ये वाढ नोंदली गेली असतानाच दुसरीकडे ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता गृहनिर्माण कंपन्यांकडून सादर होणाऱ्या नव्या प्रकल्पांच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे. २०२१ या वर्षामध्ये २ लाख ३६ हजार ७०० घरांच्या निर्मितीचे नवे प्रकल्प सादर झाले होते. त्यामध्ये २०२२ या वर्षात ५१ टक्क्यांनी वाढ होत यंदाच्या वर्षी याच सात शहरांतून एकूण ३ लाख ५७ हजार ६०० नव्या घरांच्या निर्मितीचे प्रकल्प सादर झाले आहेत. 

किंमत वाढली तरीही घर हवे

२०२२ या वर्षामध्ये मे महिन्यापासून व्याजदरात २.२५% वाढ झाली आहे. त्यामुळे कर्जदेखील महागले आहे. मात्र, तरीही स्वतःचे घर घेण्याकडे लोकांचा कल असल्याचे घरांच्या वाढत्या विक्रीच्या आकडेवारीवरून दिसून येते.

७ प्रमुख शहरांतून मिळून ३.६५ लाख घरांची विक्री

२०२२ सरत्या वर्षात ७ प्रमुख शहरांतून मिळून ३.६५ लाख घरांची विक्री झाली २०२१ याच सात शहरांत एकूण २ लाख ३६ हजार घरांची विक्री झाली होती. २०२२ वर्षात गृहविक्रीत ५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१४ देशातील या प्रमुख सात शहरांतून एका वर्षात ३.४० लाख घरांची विक्री झाली. २०२२ मध्ये २०१४ च्या घरविक्रीचा विक्रम मोडला. सर्वेक्षण : अनारॉक

२०२२ मध्ये अशी झाली घरांची विक्री

महामुंबई         १,१०,०००एनसीआर     ६३,८००पुणे         ५७,२००बंगळुरू         ४९,५००हैदराबाद     ४७,५००कोलकाता     २१,२००चेन्नई         १६,१००

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :मुंबईबांधकाम उद्योगपुणे