- पुष्कर कुलकर्णी
एक घर असताना इन्व्हेस्टमेंट म्हणून दुसरे घर घेण्याचा कल सर्वसाधारण असतोच. हे घर घेताना आपण नेमका कोणता विचार करतो हे महत्त्वाचे आहे. दुसऱ्या घराची आवश्यकता इन्व्हेस्टमेंट म्हणून खरोखरच फायद्याची आहे का नाही याचा व्यवहारी विचार करणे आवश्यक आहे. वर्तमानात पगार किंवा उत्पन्न जास्त आहे म्हणून निव्वळ दुसरे घर घेणे हे कदाचित व्यवहार्य ठरेलच असे नाही.
दुसरे घर घेताना सर्वसाधारण विचार कोणते असतात?
मुलांसाठी भविष्यात उपयुक्त
भविष्यात घरांचे दर वाढतील आणि विकायची वेळ आल्यास फायदा
दुसरे घर भाड्याने देऊन अतिरिक्त उत्पन्न मिळविणे
पहिल्या घराचे कर्ज नसेल आणि दुसऱ्या घरासाठी कर्ज घेतल्यास आयकरात वजावट मिळेल
इतर व्यवहारातून मिळालेले अतिरिक्त भांडवली उत्पन्न आणि त्यावरील नफा यावरील कर (कॅपिटल गेन टॅक्स) वाचविणे यासाठी दुसऱ्या घरात गुंतवणूक
प्रत्यक्षात हाती काय पडते हे जाणून घेणे महत्त्वाचे
कर्ज काढून दुसरे घर घेतल्यास व्याजावर जाणारी रक्कम आणि जर घरभाड्याने दिले तर प्रत्यक्षात मिळणारे उत्पन्न यातील तफावत नेमकी किती हे तपासावे.
घर खरेदी करताना शासकीय कर खर्च, प्रॉपर्टी टॅक्स, सोसायटी चार्जेस तसेच इतर केलेले सर्व खर्च आणि अधूनमधून येणारा मेंटेनन्स खर्च नेमका किती याचा हिशोब मांडावा.
ज्या भागात दुसरे घर खरेदी करतो त्या भागात भविष्यात होणारा शहरी विकास आणि त्यानुसार भविष्यात घरांचे दर अंदाजे किती वाढतील याचा ताळमेळ बसविणे आवश्यक.
मुलांसाठी जर घेताय तर त्यांना सगळे आयते देऊन आणि भविष्यातील त्यांची जबाबदारी कमी करून त्यांच्या पंखातील शक्ती कमी तर होत नाहीये ना?
वेळप्रसंगी घर विकायची वेळ आली तर अपेक्षित दर मिळेलच याची शाश्वती आहे का?
वरील सर्व मुद्द्यांचा विचार करा. दुसरे घर घेताना रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट नेमके टक्केवारीत किती हे गणित अवश्य मांडा. जर याचे प्रमाण ६ ते ७ टक्के पेक्षा कमी असेल आणि भविष्यात जर भाव वाढ मर्यादित असेल तर दुसरे घर घेणे व्यवहार्य नाही असे समजा. इतर अनेक इन्व्हेस्टमेंटस् मार्ग आहेत ज्यात आपण ७ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवू शकतो आणि भविष्यात मोठा आर्थिक संचयही साध्य करू शकतो. पहा विचार करून...