मुंबई : नववर्षात पुन्हा गृहनिर्माण क्षेत्रातील व्यवहारांचा वेग मंदावल्याचे चित्र असून मुंबई शहरात विक्री न झालेल्या घरांचे प्रमाण किमान २७.५ टक्क्यांनी वाढत ९८ हजारांवर पोहोचले आहे. तर दिल्ली- एनसीआर प्रदेश पहिल्या क्रमांकावर असून तेथे विक्री न झालेल्या घरांची आकडेवारी दोन लाखांच्या घरात आहे. उद्योगांची शिखर संस्था ‘असोचेम’ने मेट्रो शहरांतील बांधकाम उद्योगाची स्थिती विशद करणारा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तयार केला. त्यानुसार दिल्ली-एनसीआर गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत तेथील विक्री न झालेल्या घरांच्या आकडेवारीत ३० टक्के वाढ झाली आहे. तर मुंबई (२७.५ टक्के), बंगलोर (२५ टक्के), चेन्नई (२२.५ टक्के), अहमदाबाद (२० टक्के), पुणे (१९.५ टक्के), हैदराबाद (१८ टक्के) अशी वाढ झाली आहे. मुंबई व पुणे या दोन शहरांतील विक्री न झालेल्या घरांची आकडेवारी लक्षणीय आहे. मुंबईत हा आकडा ९८ हजार असला तरी तो केवळ मुंबई शहरापुरता मर्यादीत आहे.तर मुंबई व उपनगर अशी विक्री न झालेल्या घरांची आकडेवारी दीड लाखांच्या घरात जाते. घरांची विक्री न होण्यामागे मंदी हे प्रमुख कारण होते. अनेक प्रकल्पांत गुंतवणूकदारांचा पैसा असल्याने आणि त्यांची गुंतवणूक कायम ठेवण्याची क्षमताही मजबूत असल्याने बाजारात अपेक्षित करेक्शन आलेले नाही. यामुळे बांधकाम उद्योगाचे दर अपेक्षेनुसार कमी झाले नाहीत. सध्या जे फ्लॅट रिकामे आहेत, त्यांत तीन, चार, पाच बीएचके अशांची संख्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. (प्रतिनिधी)
गृहविक्रीचा वेग पुन्हा मंदावला; विक्री न झालेल्या घरांचा आकडा वाढला दिल्ली, मुंबई आघाडीवर
By admin | Published: May 07, 2016 2:24 AM