गृहकर्जाचा व्याजदर वाढलेला असतानाही २०२२ मध्ये देशातील ७ प्रमुख शहरांत विक्रमी ३.६५ लाख घरांची विक्री झाली. याआधी २०१४ मध्ये घरांची विक्रमी विक्री झाली होती.
‘ॲनारॉक’ने मंगळवारी जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, कोविड-१९ साथीनंतर घरांच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र, त्याचवेळी बांधकाम साहित्य महागल्यामुळे घरांच्या किमती ४ ते ७ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
दिल्ली-एनसीआर, मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआर), चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे या सात महानगरांतील घरांची विक्री आदल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ५४ टक्क्यांनी वाढून ३,६४,९०० घरांवर पोहोचली. गेल्या वर्षी या सात शहरांत २,३६,५०० घरांची विक्री झाली होती. २०१४ मध्ये विक्रमी ३.४३ लाख घरांची विक्री झाली होती.