Honda Nissan Merger : जपानमधील बड्या वाहन निर्माता कंपनी होंडा आणि निसाननं अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चा आणि अटकळींनंतर आता त्यांच्या विलीनीकरणाची घोषणा केली आहे. सोमवारी दोन्ही कंपन्यांनी यासंदर्भात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. हे विलीनीकरण अशा वेळी झालं जेव्हा ऑटोमोबाइल उद्योग पारंपारिक इंधनापासून इलेक्ट्रिक वाहनांकडे (ईव्ही) जात आहे.
तिसरी मोठी कंपनी बनेल
निसानची संलग्न कंपनी मित्सुबिशी मोटर्सही या विलीनीकरणात सामील होत आहे. हा करार अंतिम झाल्यास समूहातील ही नवी कंपनी विक्रीच्या दृष्टीनं जगातील तिसरी सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी बनेल. टोयोटा आणि फोक्सवॅगननंतर हा समूह तिसऱ्या स्थानावर असेल. तसंच टेस्ला आणि चिनी इलेक्ट्रिक वाहन निर्मात्यांशी स्पर्धा करण्यासाठी अधिक चांगल्या स्थितीत असेल.
५० अब्जांपेक्षा अधिक मूल्यांकन
विलीनीकरणानंतर स्थापन झालेल्या संयुक्त कंपनीचं एकूण मूल्य ५० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असेल. सध्या होंडाचं मार्केट कॅप ४० अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे, तर निसानचे १० अब्ज डॉलर आणि मित्सुबिशीचा वाटा थोडा कमी आहे. या तिन्ही कंपन्या मिळून दरवर्षी सुमारे ८० लाख वाहनं तयार करणार आहेत. टोयोटाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी २०२३ मध्ये ११.५ मिलियन वाहनं बनवली. एकट्या होंडानं गेल्या वर्षी ४ मिलियन, निसाननं ३.४ मिलियन आणि मित्सुबिशीने १ मिलियन वाहनांची निर्मिती केली.
इलेक्ट्रिक वाहनांमध्ये सहकार्य
या वर्षाच्या सुरुवातीला होंडा, निसान आणि मित्सुबिशी यांनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी (ईव्ही) पार्ट्स देण्यासाठी आणि ऑटोनॉमस ड्रायव्हिंग सॉफ्टवेअरवर संयुक्त संशोधन करण्याची योजना आखली होती. उद्योगातील झपाट्यानं होणाऱ्या बदलांशी ताळमेळ साधण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांच्या वाढत्या वर्चस्वाला तोंड देण्यासाठी या कंपन्या एकत्र आल्यात.
हे विलीनीकरण यशस्वी झाल्यास होंडा-निसान-मित्सुबिशी समूह टोयोटा, फोक्सवॅगन आणि टेस्ला सारख्या दिग्गजांना आव्हान देण्याच्या स्थितीत असेल. या कंपन्या सध्या इलेक्ट्रिक वाहन बाजारात आपल्या स्पर्धकांपेक्षा पिछाडीवर असल्यानं जपानी वाहन निर्मात्यांसाठी हे विलीनीकरण आवश्यक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.