सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघ, माझे सरकार व नीति आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वूमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया कार्यक्रमात, महाराष्ट्रातल्या कमल कुंभार (उस्मानाबाद), हर्षिनी कन्हेकर (नागपूर) व संगीता कांबळे (सातारा) या तीन महिलांना ट्रान्सफॉर्मिंग वूमन आॅफ इंडिया या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्रीय वस्त्रोद्योग व माहिती प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत, विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरी बजावणाºया १२ महिलांना पदक व प्रमाणपत्रासह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या हिंगलजवाडी येथील ग्रामीण महिला उद्योजक कमल कुंभार यांनी स्वयम् शिक्षण प्रयोग या स्वयंसेवी संस्थेमार्फत उद्योगविषयक प्रशिक्षण घेतल्यावर अवघ्या दोन हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून बांगड्यांचा व्यवसाय सुरू केला. आपल्या प्रशिक्षणाचा लाभ त्यांनी आसपासच्या ४ हजार ग्रामीण महिलांना दिला आणि त्यांनाही उद्योजक बनवले. ऊर्जा सखी म्हणूनही त्या कार्यरत आहेत. ग्रामीण भारतातील विशेष कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आला.
नागपूरच्या हर्षिनी कन्हेकर या देशातील पहिल्या महिला फायर फायटर आहेत. नागपूर येथील राष्ट्रीय फायर सर्व्हिस महाविद्यालयाच्या ४६ वर्षांच्या इतिहासात त्या पहिल्या महिला विद्यार्थिनी आहेत. आयुष्यात करिअरसाठी वेगळे क्षेत्र निवडून अन्य महिलांसमोर त्यांनी आदर्श वस्तुपाठ निर्माण केला आहे. श्रीमती कन्हेकर फायर फायटिंग क्षेत्रात अत्यंत उत्साहाने काम करीत असल्याने त्यांची पुरस्कारासाठी निवड झाली.
सातारा जिल्ह्यातील संगीता कांबळे या देशातल्या शेळ्यांच्या पहिल्या डॉक्टर आहेत. सुरुवातीच्या काळात कुचेष्टेने या व्यवसायाकडे पाहणारे आज त्यांना विशेष सन्मानाची वागणूूक देतात. माणदेशी फाउंडेशनतर्फे प्रशिक्षण घेतल्यानंतर जिल्ह्यात त्यांनी शेळीसमूहाची सुरुवात केली. त्यांच्या प्रेरणेमुळे आज शेळी डॉक्टर म्हणून अनेक महिला काम करीत आहेत. या वेगळ्या प्रयोगाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रातील तीन महिला उद्योजकांचा दिल्लीमध्ये सन्मान
संयुक्त राष्ट्र संघ, माझे सरकार व नीति आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वूमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया कार्यक्रमात, महाराष्ट्रातल्या कमल कुंभार (उस्मानाबाद), हर्षिनी कन्हेकर (नागपूर) व संगीता कांबळे (सातारा) या तीन महिलांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 02:57 AM2017-09-01T02:57:37+5:302017-09-01T02:57:42+5:30