Join us  

आजारी पडू नका; खर्च नाही पेलणार, उपचारावर होणारा खर्च ११.३५% वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 7:44 AM

६० हजार आरोग्य विमा दाव्यांचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे

नवी दिल्ली : भारतात रुग्णालयात दाखल होऊन घेण्यात येणाऱ्या उपचाराचा खर्च जलदगतीने वाढत आहे. विमा कंपनी ‘ॲको’ने जारी केलेल्या ‘इंडिया हेल्थ रिपोर्ट’मध्ये म्हटले आहे की, वित्त वर्ष २०२३-२४ साठी सरासरी आरोग्य विमा दावा ११.३५ टक्के वाढून ७०,५५८ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या वर्षी तो ६२,५४८ रुपये होता. उपचारांवर होणारा खर्च सध्या १४ टक्के आहे. जीवनशैलीशी संबंधित आजारांमुळे तो वाढला आहे. 

६० हजार आरोग्य विमा दाव्यांचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. अहवालानुसार, पुरुषांचा सरासरी आरोग्य विमा दावा वाढून ७७,५४३ रुपये, तर महिलांचा ६९,५५३ रुपये झाला.

हृदयविकारासाठी १.१ कोटींचा दावा

अहवालात म्हटले आहे की, एका विमा कंपनीला हृदयविकाराशी संबंधित उपचाराचा १.१ कोटी रुपयांचा आरोग्य विमा दावा मिळाला आहे. किडनीच्या आजाराचा एक दावा २४ लाख रुपयांचा आहे. 

कोलकता आणि मुंबई या महानगरांत हृदयविकाराशी संबंधित दाव्यांची संख्या अधिक आहे. प्रसूतीचे ६९ टक्के दावे सी-सेक्शन प्रसूतीसाठीचे आहेत.

अँजोप्लास्टीचा खर्च किती वाढला?

२०१८         १ ते १.५ लाख रुपये २०२४         २ ते ३ लाख रुपये २०३०         ६ ते ७ लाख रुपये 

मुलांना श्वसनाचे आजार

१८ वर्षांपेक्षा कमी वयोगटात श्वसनासंबंधी समस्या आढळल्या. या आजारांच्या दाव्यांचे प्रमाण ११ टक्के आहे. वाढत्या वयानुसार ट्युमर आणि ह्रदयासंबंधीचे दावे वाढत जातात.  

टॅग्स :हॉस्पिटलआरोग्यहृदयरोग