Join us  

हॉटेल अ‍ॅग्रीगेटर OYO नं जमवले ४१७ कोटी, पण कंपनीचं मूल्यांकन ७६ टक्क्यांनी घसरलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 11:37 AM

ऑनलाइन हॉटेल अ‍ॅग्रीगेटर ओयोनं इंक्रेडकडून ४१७ कोटी रुपये उभे केले आहेत. हा निधी १९,७५६ कोटी रुपये मूल्यावर उभारण्यात आला होता.

ऑनलाइन हॉटेल अ‍ॅग्रीगेटर ओयोनं (OYO) इंक्रेडकडून ४१७ कोटी रुपये (सुमारे ५ दशलक्ष डॉलर) उभे केले आहेत. हा निधी १९,७५६ कोटी रुपये मूल्यावर उभारण्यात आला होता. हे मूल्यांकन कंपनीच्या सर्वोच्च मूल्यांकनापेक्षा (१० अब्ज डॉलर) ७६ टक्क्यांनी कमी आहे. हा निधी १० कोटी डॉलर्सच्या फेरीचा भाग आहे. ओयो ही कंपनी फॅमिली ऑफिस आणि हाय नेटवर्थ व्यक्तींच्या माध्यमातून निधी उभा करत आहे. त्यानंतर पुन्हा आयपीओसाठी ड्राफ्ट प्रॉस्पेक्टस दाखल करण्याचा कंपनीचा मानस आहे.

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील युनिकॉर्ननं मे महिन्यात दुसऱ्यांदा आपला आयपीओ अर्ज मागे घेतला. कंपनी ४५ कोटी डॉलर्सचा रिफायनान्स करून आणि कर्ज फेडण्यासाठी नवीन शेअर्स जारी करून पैसे उभे करण्याच्या विचारात आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ओयोचा अॅडजस्टेड एबिटडा ८८८ कोटी रुपये (१०.७ अब्ज डॉलर) होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर आर्थिक वर्षात हा आकडा २७४ कोटी रुपये (३३ लाख डॉलर) होता.

आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीनं जगभरात ५,००० हॉटेल्स आणि ६,००० घरांची भर घातली आहे. हॉटेलचे एकूण बुकिंग मूल्य दरमहा प्रति स्टोअरफ्रंट ३.३२ लाख रुपये (४,००० डॉलर) होते. ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मचं ग्रॉस मार्जिन आर्थिक वर्ष २०२४ मध्ये सुधारणा होऊन २,५०८ कोटी रुपये (३०.२ कोटी डॉलर्स) झालं आहे, जे आर्थिक वर्ष २०२३ मध्ये २,३५० कोटी रुपये होते. या काळात कंपनीच्या ऑपरेटिंग कॉस्टमध्येही सुधारणा झाली आणि ती ग्रॉस बुकिंग व्हॅल्यूच्या १९ टक्क्यांवरून १४ टक्क्यांवर आली,' अशी माहिती या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रानं दिली.

टॅग्स :व्यवसाय