मुंबई : भारतातील पर्यटन व आदरातिथ्य व्यवसायाचा झपाट्याने विस्तार होत आहे. यामुळे निवासी हॉटेल्समध्येही वाढ होत आहे. मागील आठ महिन्यात देशभरात हॉटेल्सच्या नव्या १ लाख ४० हजार खोल्या पर्यटकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. ‘ओयो रूम्स’ या हॉटेल्स सेवा देणाऱ्या कंपनीने हे सर्वेक्षण केले आहे.सर्वेक्षणानुसार, भारतीय पर्यटन, आदरातिथ्य व हॉटेलिंग व्यवसायाचा आवाका पुढील दहा वर्षात १९,५०० कोटी डॉलर्सवर जाईल. या क्षेत्राचा सध्या जीडीपीतील वाटा ३.७ टक्के आहे. २०२८ पर्यंत हा वाटा ७.१ टक्के होईल. यात निवासी हॉटेल्स, वाहतूक, मनोरंजन व पर्यटन यांचाही समावेश असेल. मार्च २०१७ अखेर पर्यटकांना राहण्यासाठी देशभरात एकून २५ लाख खोल्या होत्या. हा आकडा नोव्हेंबर २०१७ अखेरीस २६ लाख ४० हजार इतका झाला आहे. त्यात ५.६ टक्के वाढ झाली. हा आकडा मार्च २०१९ अखेरपर्यंत २७ लाखांवर जाऊ शकतो.‘ओयो’चे या क्षेत्रातील तज्ज्ञ मणिंदर गुलाटी म्हणाले की, दोन वर्षात पर्यटन क्षेत्र सरासरी १० टक्क्यांनी वाढले. हॉटेलमधील मध्यम किंमतीच्या श्रेणीतील खोल्यांना सर्वाधिक मागणी आहे. या श्रेणीतील खोल्यांमध्ये दरवर्षी १७ टक्के वाढ होत आहे. भारतातील हे क्षेत्र आज ४०० कोटी डॉलरचे झाले आहे.केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने अलिकडेच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी साधारण १६० कोटी विदेशी पर्यटक येतात. त्यांची संख्या दरवर्षी सरासरी १३ टक्क्यांनी वाढ आहे. या पर्यटकांच्या सेवेसाठी भारतीय हॉटेलिंग व आदरतीथ्य क्षेत्राला आणखी अनेक संधी आहेत.
हॉटेलांच्या खोल्यांमध्ये आठ महिन्यात ५.६ टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 5:34 AM