नवी दिल्ली : मागील ४ वर्षांत घरांची मागणी सातत्याने वाढत असून, दुसऱ्या श्रेणीतील ३० मध्यम शहरांमध्ये घरांच्या किमतीत ९४ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
वास्तव संपदा डेटा विश्लेषक कंपनी ‘प्रॉप इक्विटी’च्या अहवालात ही माहिती दिली आहे. कंपनीने वित्त वर्ष २०२३-२४ मधील घरांच्या किमतींची वित्त वर्ष २०१९-२० मधील किमतींशी तुलना करून हा अहवाल तयार केला आहे. ही आकडेवारी देशातील ३० प्रमुख शहरांतील प्राथमिक गृहनिर्माण उद्योगाशी संबंधित आहेत. २४ शहरातील घरांच्या किमतीत २ अंकी वृद्धी झाली. उरलेल्या ६ शहरांत १ अंकी वाढ पाहायला मिळाली. १० शहरात घरांच्या किमती ५४ टक्के ते ९४ टक्के वाढल्या.
आग्रा येथे सर्वाधिक वाढ
आग्रा येथे सर्वाधिक ९४ टक्के वाढ झाली. येथे २०१९-२० मध्ये घराचा दर ३,६९२ चौरस फूट होता, २०२३-२४ मध्ये तो ७,१६३ रुपये चौरस फूट झाला.
...या शहरांत महागली घरे
घरांच्या किमतीत लक्षणीय वाढ झालेल्या ३० बाजारांत अमृतसर, मोहाली, लुधियाना, चंडीगड, पानीपत, देहरादून, भिवाडी, सोनीपत, जयपूर, आग्रा, लखनौ, भोपाळ, इंदौर, विशाखापट्टणम, विजयवाडा, गुंटूर, मंगळुरू, म्हैसूर, कोइम्बतूर, कोची, तिरुवनंतपुरम, रायपूर, भुवनेश्वर, अहमदाबाद, गांधीनगर, बडोदा, सुरत, नाशिक, नागपूर आणि गोवा यांचा समावेश आहे.