जेव्हा घराचा विषय येतो तेव्हा खरेदी करावं की भाड्यानं राहावं असा प्रश्न अनेकदा आपल्या मनात येत असतो. आपलं घर असावं असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. पण घर विकत घ्यायचं म्हटलं की कर्ज आणि पैशांची जमवाजमव असे प्रश्न आपल्यासमोर उभे ठाकतात. घरांसाठी बहुतांश लोक कर्जाचा पर्याय स्वीकारतात आणि ते फेडण्यासाठी आपली १५-२०-३० वर्ष घालवतात. काहींच्या म्हणण्यानुसार घर विकत घेण्यापेक्षा घर भाड्यानं घेऊन राहण्यात फायदा असतो. तर काही लोक आपल्या मालकीचं घर असण्यात फायदा असतो असं म्हणतात. भाड्यानं राहण्यात आर्थिक नुकसानीसोबतच अनेक प्रकारच्या समस्या आहेत. पण या दोन गोष्टींमागे अर्धसत्य सांगितलं जातं. आज आम्ही तुम्हाला संपूर्ण सत्य सांगणार आहोत. शेवटी घर कधी, कोणी आणि का घ्यायचे किंवा भाड्याने राहावं का याबाबत आपण जाणून घेऊ.
आपलं स्वतःचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. म्हणूनच काही लोक नोकरी लागताच घर किंवा फ्लॅट खरेदी करतात. विशेषतः मेट्रो शहरांमध्ये हा ट्रेंड आहे. सध्या मिळत असलेल्या गृहकर्जामुळे या गोष्टी शक्य होतात आणि उर्वरित डाऊनपेमेंटमध्ये आपली बचत टाकली जाते. परंतु घर खरेदी करताना चार गोष्टींचा विचार नक्कीच केला पाहिजे.
तुमचा पगार किती असला पाहिजे?
जेव्हा गृहकर्जाच्या ईएमआयची रक्कम कमाईच्या म्हणजेच पगाराच्या २० ते २५ टक्के असेल तेव्हा नोकरी करणाऱ्या लोकांनी घर खरेदी केलं पाहिजे. उदाहरणार्थ, जर तुमचा मासिक पगार १ लाख रुपये असेल, तर तुम्ही दरमहा २५. हजारांचा ईएमआय भरू शकता. परंतु जर तुमचा पगार ५० ते ७० हजार रुपयांच्या दरम्यान असेल आणि गृहकर्ज घेऊन घर विकत घेतलं, त्याचा ईएमआय दरमहा २५ हजार रुपये येत असेल तर हा निर्णय आर्थिकदृष्ट्या चुकीचा मानला जाईल.
कारण गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी किमान २० वर्षांचा कालावधी लागतो. घर खरेदी करू नये हा विचार किंवा सल्ला पूर्णपणे चुकीचा आहे. घर भाड्यानं घेऊनही राहण्यात फायदा आहे. जर पगाराच्या रकमेपैकी फक्त २५ टक्के रक्कम ईएमआय म्हणून जात असेल तर नक्की घर खरेदी करा. ज्यांचं वेतन ५० ते ७० हजारांदरम्यान असेल त्यांनी भाड्यानं घर घेऊन बचत करावी. तसंच १ लाखांपर्यंत वेतन गेल्यानंतर घर विकत घेण्याचा विचार करावा.
आवश्यकतेनुसार निर्णय घ्या
प्रत्येकानं गरजेनुसार निर्णय घ्यावा. तुम्ही काय करता, तुमची जॉब प्रोफाइल काय आहे? त्याआधारे निर्णय घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही सर्वप्रथम घर घेतलं तर तुम्ही एकाच ठिकाणी बांधिल राहाल. करिअरच्या संधींमुळे बहुतेक लोक सुरुवातीच्या टप्प्यात एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतरित होतात. पण पहिल्या नोकरीसोबत घर घेतल्यानंतर नोकरी बदलताना तुम्हाला विचार करावा लागू शकतो. कारण नवीन शहरात जाऊन भाड्यानं राहणं आणि नंतर आपलं घर भाड्याने देणं अनेकांना योग्य वाटत नाही. तसंच, जर तुमच्याकडे सुरक्षित नोकरी नसेल, तर घाईघाईनं घर खरेदी करू नका.
घराचं लोकेशन पाहा
जर तुम्ही घर घेण्याचं ठरवलं असेल तर निश्चितपणे चांगल्या जागेची निवड करा. तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असेल तर अशा ठिकाणी खरेदी करा जिथे तुम्हाला ते घर भाड्यानं दिली तरी चांगली रक्कम मिळेल. तसंच फ्लॅटच्या किमतीत किमान ८ टक्के वार्षिक वाढ व्हायला हवी. जेणेकरून महागाईनुसार फ्लॅटची किंमतही वाढत राहिल. जेव्हा गृहकर्जाची परतफेड केली जाईल म्हणजेच २० वर्षांनंतर फ्लॅटची सध्याची किंमत खरेदी किंमतीच्या किमान तिप्पट असावी.
जमीन खरेदीचा विचार करा
जर गुंतवणूकीचा विचार करून तुम्ही जागेत गुंतवणूक करणार असाल तर फ्लॅट खरेदी करण्याऐवजी तुम्ही टीयर २ किंवा टीयर ३ शहरांमध्ये वैयक्तिक घर खरेदी करा. जर ते करायचं नसेल तुम्ही जमीन खरेदी करण्याचा विचार करा. कायम घराच्या ऐवजी जमिनीतून अधिक फायदा झाल्याचं दिसून आलंय. तुम्ही जमिनीवर आपल्या हिशोबानं घर बनवून घेऊ शकता.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या व्यवहारांपूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)