मुंबई : चालू आर्थिक वर्षात देशात घरांच्या विक्रीचा ट्रेंड स्पष्ट करणारी आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध झाली असून, दसरा-दिवाळीत निर्माण झालेल्या तेजीचा वेग मंदावला असून घरांच्या विक्रीत १७ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले आहे.उपलब्ध माहितीनुसार, रिकाम्या पडून असलेल्या घरांची विक्री मार्गी लागावी यासाठी बिल्डरांनी अनेक अभिनव आणि आकर्षक योजनांची घोषणा करून आणि घराचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांची स्वप्नपूर्ती सहजतेने पूर्ण व्हावी याकरिता रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केल्यानंतरही, याचा फारसा सकारात्मक परिणाम घरांच्या विक्रीवर झालेला नाही. किंबहुना, गेल्या पाच वर्षांचा आढावा घेता इतकी सकारात्मक परिस्थिती असूनही घरांच्या विक्रीचा वेग मंदावल्याचेच दिसून आले आहे. गृहनिर्माण क्षेत्रात काम करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय विश्लेषण संघटनेने या संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला असून देशातील गृहविक्रीची रंजक माहिती या माध्यमातून उजेडात आली आहे. यातील प्रमुख निरीक्षण असे की, आजही मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि बंगळुरू या देशातील मेट्रो शहरांतून घराची विक्री ठप्पच असल्याचे दिसून आले आहे. या शहरांतील बहुतांश विकासकांनी फारसे नवे प्रकल्प सुरू केलेले नाहीत. तसेच बांधून तयार असलेल्या प्रकल्पांतील घरांच्या विक्रीसाठी प्रयत्नशील आहे. मेट्रो शहरांतून गृहविक्री मंदावण्याचे प्रमुख कारण म्हणजे, या बिल्डरांनी उभारलेल्या प्रकल्पातील घरांचे आकारमान हा कळीचा मुद्दा आहे. किमान टू बीचके आणि त्यावरील आकारमानाची अशी ही घरे आहेत. मुंबईबद्दल सांगायचे झाल्यास येथील घरांच्या किमती या किमान ७० लाख ते सहा कोटी रुपयांच्या दरम्यान आहेत. अर्थकारणातील मंदीमुळे घटलेल्या क्रयशक्तीमुळे आणि भरमसाठ किमतीमुळे घरांना उठाव नसल्याचे विश्लेषण बाजार विश्लेषक राजीव मेहता यांनी केले आहे. अन्य मेट्रो शहरांतील स्थिती यापेक्षा वेगळी नाही. (प्रतिनिधी)
घरांच्या विक्रीचा वेग मंदावला
By admin | Published: February 20, 2016 2:46 AM