Join us  

काहीही मिळकत नसली तरीही गृहिणींनी भरावा आयटीआर; विश्वास बसणार नाही, असे आहेत फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 7:42 AM

कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा व्यवसाय न करणाऱ्या गृहिणीही आयकर विवरणपत्र (आयटीआर) दाखल करू शकतात.

नवी दिल्ली : कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा व्यवसाय न करणाऱ्या गृहिणीही आयकर विवरणपत्र (आयटीआर) दाखल करू शकतात. कोणतेही उत्पन्न नसताना भरल्या जाणाऱ्या आयटीआरला नील रिटर्न किंवा शून्य रिटर्न म्हटले जाते. यात कोणताही कर भरावा लागत नाही. विशेष म्हणजे शून्य रिटर्न भरणे गृहिणींसाठी प्रचंड फायदेशीर ठरणारे असते. अनेक ठिकाणी त्याचा फायदा होतो. आज याबाबत जाणून घेऊया.

टीडीएस परतावा होतो सुलभ

अनेक गृहिणींच्या नावे मुदत ठेवी (एफडी) असतात. परिपक्वतेच्या वेळी त्यावर टीडीएस कापला जातो. विशेषतः करदाता १५जी किंवा एच फॉर्म भरायला विसरला असेल तर टीडीएस कापलाच जातो. अशा वेळी हा कर परत मिळण्यासाठी आयटीआर असणे आवश्यक आहे. कर्ज घेण्यासाठी उपयुक्त कर्जासाठी बँका नियमित उत्पन्न किंवा आयटीआर पाहतात. त्यामुळे गृहिणींना व्यवसायासाठी कर्ज घ्यायचे असल्यास आयटीआरचा फायदा होतो.

व्हिसासाठी उपयुक्त

नील आयटीआरमुळे व्हिसा मिळणे सोपे होते. कारण अनेक देशांच्या व्हिसासाठी दहा वर्षांपर्यंतचा आयटीआर भरणे आवश्यक आहे. अर्जदार कायदे पालन करणारा आहे, हे आयटीआरमधून सिद्ध होत असते. तसेच अर्जदार मायदेशी परतण्याएवढा सधन आहे, हेही त्यातून समजते.

केव्हा दाखल करावे शून्य रिटर्न?

ज्याचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी असते, त्यांना कोणताही कर भरावा लागत नाही. मात्र असे लोक आयटीआर भरू शकतात. कर नील किंवा शून्य असतो म्हणून त्यास नील वा शून्य रिटर्न म्हणतात. 

ही कागदपत्रे ठेवा जवळ

वित्त वर्ष २०२२-२३ साठी वैयक्तिक करदात्यांसाठी आयकर विवरणपत्र (आयटीआर) दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२३ ही आहे. दि. १८ जुलैपर्यंत तीन कोटींपेक्षा अधिक करदात्यांनी आयटीआर दाखल केले आहे. आयटीआर दाखल करण्यासाठी आवश्यक दस्तावेज पुढीलप्रमाणे आहेत.

फॉर्म १६ : हा कंपनीकडून कर्मचाऱ्यास दिला जातो. त्यात वेतन आणि कराचा तपशील असतो.फॉर्म १६ ए : हे टीडीएस प्रमाणपत्राच्या स्वरूपात असते. उदा. एफडीवर ४० हजारांपेक्षा अधिकचे व्याज मिळाल्यास हा फॉर्म आवश्यक आहे.

व्याज उत्पन्न वा अन्य व्याज प्रमाणपत्र-बँका अथवा पोस्टातील ठेवींवर किती व्याज मिळाले याचा तपशील यात असतो.

वार्षिक माहिती विवरण (एआयएएस)कर बचत गुंतवणूक आणि खर्च प्रमाणपत्रसंपत्ती, शेअर, म्युच्युअल फंडवरील लाभबिटकॉइन असल्यास विक्रीचे दस्तावेजआधार क्रमांकनॉन लिस्टेड शेअर्समधील गुंतवणुकीचा तपशीलबँक खात्यांचा तपशील

चुकवू नका ३१ जुलैची मुदत

आयकर विवरण भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत आहे. आतापर्यंत ३ काेटींपेक्षा जास्त आयकर विवरण दाखल करण्यात आले आहेत. ३१ जुलैनंतर विवरण भरल्यास दंड आकारण्यात येणार आहे.