Join us

गुलाबी टेन्शन कसे जाणार, खरेदीचा सपाटा वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 1:13 PM

सामान्य नागरिकांसोबत, व्यावसायिक, विक्रेतेही हैराण

मुंबई : दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या नोटा बँकांमध्ये बदलून दिल्या जात आहेत. त्यामुळे घरी ठेवलेल्या, साठवलेल्या दोन हजारांच्या नोटा खपवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू झाली आहे. नोटा बँकेत जमा करण्याऐवजी अनावश्यक किंवा अतिरिक्त खरेदीचा सपाटा लावल्याचे चित्र आहे. परिणामी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे, बॅग, पर्सेस, दागिने, घड्याळे यांच्या विक्रीमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे विक्रेते सांगत आहेत.

३० सप्टेंबरनंतर नोटांचे काय ? आरबीआयनुसार, ३० सप्टेंबरपर्यंत २००० रुपयांच्या नोटा बदलता येऊ शकतात. ३० सप्टेंबरपर्यंत २००० च्या आत नोटा जमा करता आल्या नाही, तर डेडलाइननंतर अर्थात दिलेल्या मुदतीनंतर या नोटा बँकेत एक्स्चेंज किंवा डिपॉझिट करता येणार नाहीत.  दिलेल्या मुदतीनंतर  २००० रुपयांच्या नोटा मिळाल्यास कोणतीही  कारवाई केली जाणार नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी तर या नोटा बदलण्यासाठी बँकांच्या पायऱ्या चढण्याचे कष्ट घेण्याऐवजी अनेकांनी नोटा कामगार, कष्टकरी वर्गाच्या माथी मारण्याचे प्रकार सुरू केले आहेत. कामगार, हमाल, मजूर आणि शेतमालाची विक्री करायला येणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे चुकते करण्यासाठी दोन हजार रुपयांची नोट दिली जात आहे.

व्यावसायिक आणि विक्रेतेही बुचकळ्यातदोन हजारांच्या नोटांचा ओघ अचानक वाढल्याने आता व्यापारी वर्गही बुचकळ्यात पडला आहे. अगदी लहान-सहान खरेदीसाठीही दोन हजारांच्या नोटा घेऊन येणाऱ्या ग्राहकांमुळे विक्रेत्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी आता एक हजार किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या वस्तू खरेदी केल्या तरच दोन हजारांच्या नोटा स्वीकारल्या जातील, असे दुकानदारांकडून सांगितले जात आहे.

दैनंदिन खरेदीत नोटांचा व्यवहार वाढलाकेंद्र सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये पूर्वसूचनेविना ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा अचानक रद्द केल्या. त्यावेळी बँकेत जाऊन नोटा बदलून घेताना नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. तशी स्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून दोन हजारांची नोट व्यवहारातच खपवण्याचा बहुतेकांचा प्रयत्न आहे. त्यासाठी गरज नसलेल्या वस्तूंची खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल आहे. त्यामुळे मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये गेल्या काही दिवसांत गर्दी वाढल्याचे चित्र आहे. नेहमी लागणाऱ्या पण साठवून ठेवता येतील अशा वस्तूही खरेदी केल्या असल्याचे चित्र आहे.

डिजिटल व्यवहारांत घट गेल्या काही वर्षांपासून विशेषत: कोरोनाकाळात नागरिकांना डिजिटल व्यवहारांची सवय लागली होती. आता मात्र, मोठ्या रकमेची खरेदी रोखीने करण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन हजारांच्या नोटा देऊन खरेदी वाढल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. किरकोळ खरेदी असो किंवा मोठी; आधी डिजिटल व्यवहार वाढल्याचे दिसून आले होते; मात्र या आठवड्यात अचानक यात घट होऊन लोक थेट दोन हजारांच्या नोटा समोर करत असल्याचे दादरमधील दुकानमालक सांगत आहेत.

टॅग्स :मुंबईपैसा