नवी दिल्ली : डेबिट तसेच क्रेडिट कार्डांचा वापर हल्ली मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. काही व्यक्ती जबाबदारीने कार्डावर असलेली देणी वेळेवर भरतात. विलंब शुल्क भरावे लागू नये, याची काळजी घेतात. असे असूनही त्यांचा क्रेडिट स्कोअर नकारात्मक असतो. याचा फटका त्यांच्या कर्ज काढण्याच्या क्षमतेवर होतो. हा स्कोअर चांगला नसेल तर बँका किंवा वित्तीय संस्था कर्ज देण्यास नकार कळवतात. यामुळे क्रेडिट स्कोअर नेमका का सुधारत नाही, या चिंतेने हैराण होतात. अशावेळी त्यांनी पुढील बाबींची पडताळणी करणे गरजेचे असते.
हाय क्रेडिट युटीलायझेशन : बँकाकडून तुम्हाला दिलेल्या क्रेडिट कार्डावर खर्चासाठी एक विशिष्ट मर्यादा घालून दिलेली असते. मर्यादेच्या किती प्रमाणात खर्च केला जात आहे हे मोजले जाते. एकूण मर्यादेच्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक खर्च केला जात असेल ते वाईट मानले जाते. हा खर्च ३० टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर स्कोअर वाढण्यास मदत होते.
क्रेडिटमध्ये वैविध्याचा अभाव : दैनंदिन कर्जांचे व्यवहार करताना तुम्ही नेहमी होम लोन, पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड अशी विविधता सांभाळली आहे की नाही, हे पाहिले जाते. मिक्स क्रेडिटचा वापर केला नसल्यास कमी स्कोअर दिला जातो. अनेक जण याकडे लक्ष देत नाहीत.
अनेक वेळा केलेला अर्ज : कर्ज किंवा कार्डासाठी काहीजण अनेकवेळा अर्ज करतात. अनेक बँका किंवा संस्थांमध्ये कागदपत्रे देऊन ठेवतात. प्रत्येक वेळेला तुमचा स्कोअर पडताळला जातो. हे नकारात्मक मानले जाते. ज्यामुळे स्कोअरमधील काही पॉइंट घटतात.
क्रेडिट कार्डामधील चुका : तुम्ही केलेले व्यवहार आणि खर्चाचा तपशिल कार्डच्या स्टेटमेंटमध्ये असावा. याची सतत पडताळणी केली पाहिजे. अन्य कोणत्याही संशयास्पद व्यवहाराचा त्यात समावेश असेल तर त्यामुळे स्कोअर घटतो.
भागीदारीत काढलेले कर्ज : अनेकदा मित्र वा नातेवाइकांना मदतीसाठी आपण भागीदारीत कर्ज काढून देतो. त्या व्यक्तीला जामीन राहतो. परंतु, संबंधित व्यक्तीने कर्जाची परतफेड वेळेत न केल्यास तुमच्या स्कोअरला फटका बसतो.