Join us

हिंडेनबर्गच्या अफवेनंतरच्या संकटातून कसा बाहेर आला Adani Group, खुद्द गौतम अदानींनी सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 9:15 AM

गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समूहाच्या कंपन्यांना मोठा फटका बसला होता. गौतम अदानी यांच्या अनेक कंपन्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं होतं.

गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समूहाच्या कंपन्यांना मोठा फटका बसला होता. गौतम अदानी यांच्या अनेक कंपन्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं होतं. परंतु आता समूह त्यातून बाहेर आला आहे. दरम्यान, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी बुधवारी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात यावर भाष्य केलं आणि त्या संकाटाचा सामना कसा केला हेदेखील सांगितलं.  

"जेव्हा पहिल्यांदा बातमी आली तेव्हा पाहिलं तर सर्व आरोप जुनेच होते. ते रिपोर्टमध्ये निराळ्या पद्धतीनं पुन्हा सांगण्यात आले होते. अदानी समूहावर असा हल्ला हा नवा नव्हता. हे आरोप लवकरच खोटे ठरतील अशी आम्हाला अपेक्षा होती. आता सत्य सर्वाच्या समोर आलं आहे," असं गौतम अदानी यावेळी म्हणाले. "अदानी समूहावर हिंडेनबर्गचा हल्ला हा कॉर्पोरेट घराण्यांवरील सर्वात मोठा हल्ला होता. हा एक दुटप्पी हल्ला होता हे सांगण्यात मला संकोच वाटत नाही. आमच्या विरोधात हा हल्ला केवळ फायनान्शिअल मार्केटमध्ये करण्यात आलेला हल्ला नव्हता, तर हे प्रकरण राजकीय वर्तुळातही याची चर्चा करण्यात आली. भारत आणि विदेशातील माध्यमांमधील एका वर्गानं याला पाठिंबाही दिला होता," असं त्यांनी नमूद केलं. 

लवकरच यामागील कट समजला 

 "आम्ही सुरुवातीला हिंडेनबर्ग अहवालाच्या प्रभावाला खूप कमी लेखलं होतं. परंतु, लवकरच आम्हाला कट आणि त्याची खोली समजली. आम्हाला असे संकट हाताळण्याचा कोणताही पूर्वीचा अनुभव नव्हता. त्यामुळे आम्ही हाताळण्यासाठी आमची स्वतःची प्रतिकारात्मक रणनीती आखली. बाकी तो आता इतिहास आहे..," असं त्यांनी स्पष्ट केलं.  

दोन गोष्टी प्रामुख्यानं शिकलो 

हिंडेनबर्ग प्रकरणात अदानी समूहानं २ प्रमुख गोष्टी शिकल्या. पहिली म्हणजे कॅश इज किंग आणि दुसरी म्हणजे स्टेकहोल्डर्ससोबतचं तुमचं नातं आणि मजबूत कम्युनिकेशन आवश्यक आहे, असं गौतम अदानी यावेळी म्हणाले. 

'या' गोष्टीचं सर्वाधिक दु:ख 

"संपूर्ण हिंडेनबर्ग प्रकरणात मला सर्वाधिक दु:ख या गोष्टीचं झालं की अनेक रिटेल शेअर होल्डर्सनं आपले पैसे गमावले. मला त्यांच्याबद्दल वाईट वाटत आहे. कारण कोणत्याही कारणाशिवाय त्यांना पैसे गमवावे लागले. हिंडेनबर्गच्या आरोपात कोणतंही तथ्य नव्हतं. सर्वच आरोप खोटे होते. जेव्हा अदानी समूहाच्या कंपन्यांनी कॅपिटल मार्केटमध्ये आपली फायनान्शिअल व्हॅल्यू पुन्हा मिळवलं तेव्हा या गोष्टी सिद्ध झाल्या," असं गौतम अदानी यांनी नमूद केलं. 

टॅग्स :गौतम अदानीअदानी