Join us  

Gratuity Rule: पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या नोकरीतही मिळते ग्रॅच्युटी! किती आणि कशी? जाणून घ्या गणित...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 2:33 PM

सरकारनं नव्या लेबर कोडमध्ये ग्रॅच्युटीच्या नियमांमध्ये बदल करण्याचे संकेत दिले आहेत. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

नवी दिल्ली-

सरकारनं नव्या लेबर कोडमध्ये ग्रॅच्युटीच्या नियमांमध्ये बदल करण्याचे संकेत दिले आहेत. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये ग्रॅच्युटी संदर्भात अनेक प्रश्न असतात. यातील सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे एखाद्या संस्थेत नोकरीची पाच वर्ष पूर्ण होण्याआधी गॅच्युटी मिळू शकते का? यासोबत ग्रॅच्युटी संदर्भात वेगवेगळे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात असतात. याचीच उत्तरं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करुयात. 

ग्रॅच्युटी म्हणजे काय आणि कुणाला मिळते?ग्रॅच्युटी म्हणजे काय हे आधी सर्वात आधी समजून घेऊयात. कंपनीकडून आपल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी दिली जाते. कंपनीसाठी सलग काम केल्याच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्याला ग्रॅच्युटीच्या माध्यमातून एक आभार राशी दिली जाते. देशातील सर्व कारखाने, खाणी, ऑइल फिल्ड, बंदर आणि रेल्वेत पेमेंट अँड ग्रॅच्युटी अॅक्ट लागू आहे. तसंच ज्या संस्थेत १० पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात असा सर्व कंपन्या किंवा दुकानांना आपल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीचा लाभ द्यावा लागतो. 

ग्रॅच्युटीचा कायदा काय?कोणत्याही कंपनीत सगल पाच वर्ष काम केल्यानंतर कर्मचारी ग्रॅच्युटी प्राप्त करण्यास पात्र ठरतो. पण काही प्रकरणांमध्ये पाच वर्षांपेक्षा कमी काम केलं तरी ग्रॅच्युटीचा लाभ मिळू शकतो. ग्रॅच्युटी कायद्यातील सेक्शन-2A मध्ये सलग सेवा प्रदान करण्याबाबतचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. यानुसार पूर्ण पाच वर्ष काम न करतानाही अनेक कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीचा फायदा प्राप्त करता येतो असं नमूद आहे. 

पाच वर्षांपेक्षा कमी काम केलं तरी मिळते ग्रॅच्युटीग्रॅच्युटी कायद्यातील सेक्शन- 2A तील तरतुदीनुसार भूमिगत खाणींमध्ये काम करणारा कर्मचारी जर सगल ४ वर्ष १९० दिवस काम करतो तर ग्रॅच्युटी मिळवण्यासाठी पात्र धरला जातो. तसंच इतर काही संघटनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानं ४ वर्ष ८ महिने सलग काम केलं असेल तर तो ग्रॅच्युटीसाठी ग्राह्य धरला जातो. महत्वाची बाब म्हणजे नोटीस पीरिएड देखील ग्रॅच्युटीमध्ये जोडला जातो. 

ग्रॅच्युटीची गोळाबेरीज कशी केली जाते?एकूण ग्रॅच्युटीची रक्कम= (शेवटचा पगार)x(15/26)x(कंपनीत किती वर्ष काम केलं). समजा तुम्ही एखाद्या कंपनीत सलग ७ वर्ष काम केलं आणि तुमचा पगार ३५ हजार रुपये इतका आहे. तर आकडेमोड केल्यास ३५,००० x(१५/२६)x(७)= १,४१,३४६ रुपये. कोणत्याही कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त २० लाख रुपयांपर्यंत ग्रॅच्युटी मिळू शकते. 

टॅग्स :व्यवसाय