नवी दिल्ली : १९ मे रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील.
त्यानंतर सातव्या वेतन आयोगाचा निर्णय केंद्र सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगाने वेतन आणि भत्त्यांत सरासरी २३.५५ टक्क्यांची वाढ सुचविली आहे. वेतनातील वाढ १६ टक्के, तर भत्त्यांतील वाढ
६३ टक्के राहील. निवृत्तिवेतनातील वाढ २४ टक्के राहणार आहे.
43 लाख केंद्रीय कर्मचारी आणि ५३ लाख निवृत्तिवेतनधारक वेतन आयोगाचे लाभधारक ठरणार आहेत. १ जानेवारी २0१६पासून पूर्वलक्षी प्रभावाने आयोगाची अंमलबजावणी होणार आहे. वेतनवाढ आणि मागील थकबाकीपोटी तब्बल १.0२ लाख कोटी रुपये बाजारात येणार आहेत. यामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती रिझर्व्ह बँकेकडून व्यक्त होत आहे.
एकरकमी हाती येणाऱ्या पैशांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. पैसा आल्यानंतर दीर्घ सुट्या, महागडी खरेदी, गाड्यांचा सोस अशी आमिषे कर्मचाऱ्यांसमोर असतील. त्यांना बाजूला सारणे हिताचे ठरेल. या पार्श्वभूमीवर
‘हम फौजी इनिशिएटिव्ह’चे सीईओ तथा वित्तीय सल्लागार संजीव गोविला यांनी अभ्यासांती पैशाच्या विनियोगाचे पाच उत्तम मार्ग सुचविले आहे. तुम्ही आयोगाचे लाभधारक असाल, तर या मार्गांचा विचार करू शकता.
>आपत्कालीन निधी उभारा
संकटाच्या काळात उपयुक्त ठरू शकेल, असा निधी वाढीव वेतनातून उभारून ठेवणे हा एक विनियोगाचा चांगला मार्ग ठरू शकतो. ऐनवेळी उद्भवलेल्या संकटाच्या काळात लोक महागडी कर्जे किंवा नातेवाइकांकडून उसनवाऱ्या करीत असतात. त्यावर आपत्कालीन निधी चांगला मार्ग ठरू शकतो. सहा महिन्यांचा वाढीव पगार बाजूला काढून वेगवेगळ्या बँकांत मुदत ठेवींच्या स्वरूपात ठेवावा. अथवा लिक्विड म्युच्युअल फंडात गुंतवावा.
>अत्यावश्यक आर्थिक
गरजांची परिपूर्ती
प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काही अत्यावश्यक आर्थिक गरजा अथवा ध्येये असतात. याचे दोन भाग पडतात. एक म्हणजे गंभीर गरजा आणि दुसऱ्या जीवनशैलीविषयक गरजा. गंभीर गरजांत मुलांच्या शिक्षणावरील खर्च, लग्न, निवृत्ती काळातील खर्च, औषधी इत्यादींचा समावेश होतो. दुसऱ्या प्रकारच्या गरजांत कार बदलणे, सुट्यांवर जाणे तसेच अन्य सुखवस्तू बाबींचा समावेश होतो.
>योग्य संपत्ती वितरण
हाती आलेला पैसा गुंतविण्यासाठी योग्य नियोजनाची गरज असते. त्यालाच संपत्ती वितरण म्हणतात. आपली गरज आणि क्षमतेनुसार गुंतवणुकीचे पर्याय निवडायला हवेत, तसेच जोखीम पत्करण्याची क्षमता, जोखमीकडे पाहण्याचा दृष्टिकोन या बाबींवरही गुंतवणुकीचे पर्याय निवडताना विचार करावा.
>दीर्घकालीन आणि
अल्पकालीन गुंतवणूक
करताना दीर्घकालीन आणि अल्पकालीन पर्यायांचा योग्य प्रकारे विचार करावा. समभागांत गुंतवणूक करणे हा दीर्घकालीन पर्याय आहे. कर्ज हा अल्पकालीन पर्याय
आहे. जमीन-जुमला, सोने-चांदी यातील गुंतवणूक या दोन्हींच्या सीमारेषांवर येते. जमीन-जुमला आणि सोन्या-चांदीच्या किमती हंगामाप्रमाणे बदलत राहतात. तो घटक गुंतवणूक करताना लक्षात घ्यायला हवा.
>जोखमीची समीक्षा
गुंतवणूक करताना किती जोखीम उचलायची
हे गुंतवणूकदाराच्या वयानुसार ठरते.
तथापि, बऱ्याचशा गोष्टी तुमचा दृष्टिकोन आणि सध्याची आर्थिक स्थिती यावर अवलंबून असतात. गुंतवणुकीचा जोखीम प्रोफाईल
नीट पाहून घ्यायला हवा. केवळ बाह्य संकेत पाहून निर्णय घेऊ नये.
सातव्या वेतन आयोगामुळे मिळालेला पैशांचा कसा कराल विनियोग
१९ मे रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. त्यानंतर सातव्या वेतन आयोगाचा निर्णय केंद्र सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.
By admin | Published: May 18, 2016 05:43 AM2016-05-18T05:43:33+5:302016-05-18T05:43:33+5:30