प्रत्येकाला श्रीमंत होण्याची इच्छा असते. मात्र श्रीमंत होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. मात्र एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून दररोज त्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकल्यास यशस्वी होता येऊ शकतं. यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याची आवश्यकता असते. मात्र ही गुंतवणूक करायची कुठे, असा प्रश्न अनेकांसमोर असतो.
सध्या अनेकजण म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करतात. या माध्यमातून श्रीमंत होण्याचं स्वप्न अनेकजण पाहतात. यातील काहींची स्वप्नं पूर्णदेखील झाली आहेत. वीस वर्षांपूर्वी म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करणारे अनेकजण आज कोट्यधीश झाले आहेत. आताही म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक केल्यास कोट्यधीश होता येऊ शकतं. मात्र त्यासाठी योग्य वयात सुरुवात करणं अतिशय गरजेचं आहे. कारण तुम्ही जितक्या कमीत कमी वयात म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक सुरू कराल, तितके चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील.
एखाद्या व्यक्तीनं नोकरी करण्यास सुरुवात करताच म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक सुरू केली, तर त्याला एका ठराविक कालावधीनंतर चांगला परतावा मिळू शकतो. उदाहरणार्थ; एखाद्या व्यक्तीनं 20 व्या वर्षी नोकरी करण्यास सुरुवात केली. त्या व्यक्तीला 20 हजार रुपये पगार मिळत असेल आणि त्यातून त्यानं दररोज 30 रुपये वाचवल्यास महिन्याकाठी 900 रुपयांची बचत येईल. ही रक्कम सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लानच्या (एसआयपी) माध्यमातून म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवता येईल.
म्युच्युअल फंड्समधून 20 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो. मात्र आपण साधारणत: 12.5 टक्के परताव्याची अपेक्षा करु शकतो. हे प्रमाण लक्षात घेता 20 वर्षांच्या तरुणानं 40 वर्षे गुंतवणूक केल्यास वयाच्या 60 व्या वर्षी तो कोट्यधीश होऊ शकतो. कारण दर महिन्याला 900 रुपये अशी गुंतवणूक 40 वर्षे केल्यास तुमची एकूण गुंतवणूक 4 लाख 32 हजार इतकी होते. मात्र परताव्याचा दर 12.5 टक्के असल्यास 40 वर्षानंतर तुम्हाला 1 कोटी 1 लाख 55 हजार 160 रुपये मिळू शकतात. म्युच्युअल फंड्समध्ये दीर्घ काळासाठी करण्यात आलेली छोटी गुंतवणूक नंतर प्रचंड मोठी होते. त्यामुळेच या माध्यमातून श्रीमंत होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे गुंतवणूक क्षेत्रातील जाणकार म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात.
दररोज 30 रुपये वाचवा अन् करोडपती व्हा!
दररोज थोडी बचत करुन मिळवा मोठा फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 12:17 PM2018-09-05T12:17:21+5:302018-09-05T12:19:03+5:30