Join us

बाजारातून चांगले शेअर्स नेमके कसे निवडाल?; शेअर होल्डिंग पॅटर्नही जाणून घ्या...!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 10:09 AM

दीर्घकालीन गुंतवणूकदार नेहमी कंपनीच्या फंडामेंटल्स वर विश्वास ठेवतात. 

भाव कमी असेलेले शेअर्स चांगले का महाग किंमतीत असेलेले  शेअर्स चांगले? याचे उत्तर म्हणजे, चांगले शेअर्स हे त्या कंपनीच्या फंडामेंटल्स वरून ओळखता येतात. दीर्घकालीन गुंतवणूकदार नेहमी कंपनीच्या फंडामेंटल्स वर विश्वास ठेवतात.     

फंडामेंटल म्हणजे नेमके काय? 

कंपनीचा व्यवसाय, उलाढाल, नफा आणि कंपनीबद्दल अशा सर्व गोष्टी ज्या थेट तिच्या शेअरच्या भावाशी निगडित असतात यास फंडामेंटल असे म्हणतात. शेअरचा भाव कंपनीच्या कामगिरीनुसार  योग्य आहे का  कमी आहे किव्वा जास्त आहे या सर्व गोष्टी फंडामेंटल मुळे अवगत होतात. 

तिमाही निकाल / वार्षिक निकाल : 

तिमाही आणि वार्षिक निकालात एकूण उलाढाल, विक्री, कारपूर्व नफा आणि कर पश्चात नफा ही आकडेवारी जाणून घ्यावी. यात मागील तिमाही आणि मागील वर्षीची त्याच कालावधीची आकडेवारीशी  वर्तमान निकालाची आकडेवारी तपासून पाहावी. यावरून कंपनीची कामगिरी कशी सुरु आहे हे जाणून घेता येते.  

प्राईस अर्निंग रेशो (पी ई ) 

शेअरचा बाजार सध्य बाजारभाव भागिले अर्निंग पर शेअर (ई पी एस) म्हणजेच पी ई रेशो. हा रेशो जितका जास्त तितका शेअर ची किंमत तुलनात्मक महाग असे समजले जाते. परंतु काही कंपन्यांचा कारभार अत्यंत उत्तम चालतो आणि अशा कंपनीच्या शेअर्स ला मागणी जास्त असते म्हणून पी ई रेशो जास्त पाहावयास मिळतो. शेअर्सला मागणी वाढली आणि तो ओव्हर बॉट  झोन मध्ये  (उच्चतम खरेदी पातळी वर) गेला तर पी ई रेशो जास्त दिसतो. इथूनच जर विक्रीचा मारा सुरु झाला तर भाव खाली येतात आणि त्यानुसार पीई रेशो खाली आलेला दिसतो.

अर्निंग पर शेअर (ई पी एस ) :

कंपनीचा प्रतिशेअर नफा जे दर्शविते ते म्हणजे अर्निंग पर शेअर. कंपनीचा एकूण नफा भागिले  एकूण शेअर्स वजा डिव्हीडंड रक्कम  सोप्या भाषेत सांगायचे तर जितका जास्त ईपीएस तितका कंपनीचा नफा जास्त. आता नफा जास्त म्हणजे शेअर्स ला अधिक मागणी. याचाच अर्थ पीई रेशो सुद्धा अधिक. 

शेअर होल्डिंग पॅटर्न  :

फंडामेंटल मध्ये हा एक महत्वाचा घटक आहे. यामध्ये कंपनीचे शेअरधारक आणि त्यांची विभागणी नेमकी कशी आहे ते समजते. हा पॅटर्न खालील प्रमाणे असतो. 

  • प्रमोटर्स : कंपनीचे प्रवर्तक म्हणजेच प्रमोटर्स. त्यांचा हिस्सा सर्वात जास्त असतो.
  • विदेशी गुंतवणूकदार:  विदेशी गुंतवणूकदार भारतीय कंपन्यांमध्ये पैसे गुंतवू शकतात. त्यांचा हिस्सा नेमका किती हे पाहावे. 
  • म्युच्युअल फंड्स  : म्युच्युअल फंड्स कंपन्यांकडे बाजार विशेषतज्ञ असतात जे नियमित अभ्यास करून विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करीत असतात. त्यांचा हिस्सा  फंडामेंटल मध्ये आपल्याला दिसतो. 
  • घरेलू गुंतवणूकदार  : भारतीय वित्तीय संस्था आणि मोठे गुंतवणूकदार यांना घरेलू गुंतवणूकदर (डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स ) असे म्हणतात. या कंपन्या बाजारात अनेक कंपन्यांमध्ये पैसे गुंतवीत असतात. 
  • विमा कंपन्या : आयुर्विमा तसेच इतर सर्व प्रकारच्या संस्था थेट शेअर बाजारात पैसे गुंतवतात.
  • इतर सर्वसाधारण : आपल्यासारखे गुंतवणूकदार ज्या संस्था नाहीत असे सर्व या प्रकारात मोडतात. या पॅटर्न मध्ये तिमाही आणि वार्षिक स्तरावर  तफावत आढळून आल्यास ती दिशादर्शक ठरते. 
टॅग्स :शेअर बाजारव्यवसाय