Bigbasket Success Story: आजच्या काळात कपडे असोत की जेवण किंवा किराणा सामान असो, ऑनलाइन वस्तू मागवण्याचं प्रमाणात वाढलं आहे. आजच्या काळात अशा अनेक क्विक कॉमर्स कंपन्या आहेत ज्या केवळ १० ते १५ मिनिटांत ऑनलाइन किराणा माल पोहोचवत आहेत. या क्विक कॉमर्स कंपन्यांपैकी एक बिग बास्केट देखील आहे, परंतु तुम्हाला माहीत आहे का बिगबास्केट कोणी आणि कसं सुरू केलं? आज आम्ही तुम्हाला बिगबास्केटच्या आजवरच्या प्रवासाबद्दल सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.
२६ वर्षांपूर्वीचा इतिहास
बिगबास्केटची सुरुवात २६ वर्षांपूर्वी १९९९ मध्ये झाली होती. बिग बास्केटचे सहसंस्थापक हरी मेनन आहेत. त्यांनी आपल्या मित्रांसोबत मिळून बिगबास्केट सुरू केलं. हरी मेनन यांनी इंजिनीअरिंग केलं असून, त्यानंतर त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी हरी मेनन यांनी आपल्या ४ मित्रांसोबत मिळून फॅबमार्ट ही ई-कॉमर्स वेबसाईट सुरू केली. परंतु तो व्यवसाय चालला नाही आणि नंतर तो बंद झाला.
स्विगीला आयकर विभागाची १५८ कोटी रुपयांची नोटीस; काय आहे नेमकं प्रकरण?
हरी मेनन यांनी हार मानली नाही आणि पुन्हा त्याच क्षेत्रात नवीन स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी फॅबमॉल सुरू केलं, ज्याअंतर्गत त्यांनी आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळमध्ये आपले २०० स्टोअर्स पसरवले. यावेळी हरी यांना यश मिळाले आणि २००६ सालापर्यंत फॅबमॉल ही भारतातील सर्वात मोठी रिटेल चेन बनली.
बिग बास्केटची सुरुवात
जसजसा काळ जात गेला तसतसा हरी यांना येणारा काळ पूर्णपणे डिजिटल होणार असल्याचं समजलं, म्हणजेच येणाऱ्या काळात ऑनलाइन वस्तूंची विक्री होऊ शकते याची जाणीव त्यांना झाली. २०११ मध्ये हरी यांनी बिगबास्केट सुरू केलं, ज्यानं ई-कॉमर्स फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स क्षेत्रात मोठं यश मिळवलं. सुरुवातीच्या काळात हरी यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागले, पण हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढत गेला. २०१४ मध्ये शाहरुख खान बिगबास्केटचा ब्रँड एंबेसेडर बनला. अशा प्रकारे बिगबास्केट एक मोठा ब्रँड बनला.