लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जीएसटीत आयुर्वेदिक औषधांवर चढ्या दराने कर लावण्यात आल्यामुळे पतंजली उद्योग समूहाने सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. उत्तम प्रकृतीचा हक्क मिळाल्याशिवाय ‘अच्छे दिन’ कसे येणार, असा प्रश्न पतंजलीने विचारला आहे. आयुर्वेदिक उत्पादन संघटनेनेही वाढीव कराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
सध्याच्या आयुर्वेदिक औषधांवर ७ टक्के कर आहे. जीएसटीमध्ये तो १२ टक्के करण्यात आला आहे. पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे प्रवक्ते एस. के. तिजरावाला यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, आयुर्वेदिक उत्पादनांवरील वाढीव जीएसटीमुळे आम्ही आश्चर्यचकित झालो आहोत. ही बाब अत्यंत निराशाजनक आणि हताश करणारी आहे. आयुर्वेद सामान्य माणसांना परवडणाऱ्या किमतीत उपचार उपलब्ध करून देतो. ही अत्यंत प्राचीन आणि हजारो वर्षांत सिद्ध झालेली उपचार पद्धती आहे. तिला अशी वागणूक देणे उचित नाही. चांगले आरोग्य आणि आरोग्यदायी जीवन हा सामान्य माणसाचा मूलभूत हक्क आहे. त्याशिवाय लोकांना अच्छे दिन कसे अनुभवास येतील?
असोसिएशन आॅफ मॅन्युफॅक्चरर्स आॅफ आयुर्वेदिक मेडिसिन्स (आमाम) या संस्थेचे सरचिटणीस प्रदीप मुलतानी यांनी म्हटले की, जेनरिक आयुर्वेदिक औषधांवर कोणताही कर नसावा. पेटंट असलेल्या औषधांवर ५ टक्के कर असावा. भारत सरकार आयुर्वेदिक औषधांचा आक्रमकपणे प्रचार करीत आहे.
आयुर्वेदिक औषधे परवडणार कशी?
आयुर्वेदिक औषधी सामान्य माणसांना परवडणार नसतील, तर त्याचा उपयोग काय? पंतप्रधान आयुष व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करीत असताना अशा प्रकारे वाढीव कर लावणे दुर्दैवी आहे. मुलतानी म्हणाले की, आधीच्या संपुआ सरकारने आयुर्वेदिक उद्योगास सापत्न वागणूक दिली. या सरकारने मात्र चांगली पावले उचलली होती; मात्र आता जीएसटीमधील वाढीव कराने यावर पाणी फिरणार आहे.
अच्छे दिन येणार तरी कसे? - पतंजली
जीएसटीत आयुर्वेदिक औषधांवर चढ्या दराने कर लावण्यात आल्यामुळे पतंजली उद्योग समूहाने सरकारवर टीकास्त्र सोडले आहे
By admin | Published: May 30, 2017 12:40 AM2017-05-30T00:40:55+5:302017-05-30T00:40:55+5:30