- सी. ए. उमेश शर्मा
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, जीएसटी रिटर्नमध्ये विक्रीची माहिती टाकताना काही चुका झाल्या, तर त्या सुधारता येतात का?
कृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, ३१ जुलैचे आयकराचे रिटर्न फायनल करणे चालू आहे. त्यात जीएसटीच्या अनेक समस्या येत आहे. अजूनही रिव्हाइज रिटर्नचा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे जीएसटी अंतर्गत एकदा दाखल केलेल्या रिटर्नमध्ये कोणतीही सुधारणा करता येत नाही, परंतु विक्री बिलाचा तपशील दाखल करताना एखादी लहान मोठी चूक झाली, तर ती पुढील महिन्याच्या रिटर्नमध्ये सुधारली जाऊ शकते.
अर्जुन : कृष्णा, जीएसटीआर-१ मध्ये बिलवाइज तपशील दाखल करतानी चूक झाली तर काय करावे?
कृष्ण : अर्जुना, जीएसटीआर १ मध्ये करपात्र रक्कम, कराचा दर किंवा कराची रक्कम यांमध्ये चूक झाली, तर ती सुधारली जाऊ शकते, परंतु जीएसटीआयएन, पार्टीचे नाव, यांमध्ये चूक झाली, तर ती सुधारता येत नाही. करपात्र रक्कम, कराची रक्कम, दर इत्यादीमध्ये चूक झाल्यास पुढील महिन्याच्या जीएसटीआर १ मध्ये अमेंडमेंट टू इन्व्हॉइस यामध्ये सुधारित तपशील टाकता येतो.
उदा. ‘अ’ने एप्रिल महिन्याच्या जीएसटीआर १ मध्ये बी-टू-बी (जीएसटीआयएन उपलब्ध असलेल्या व्यक्तीला विक्री करणे किंवा त्याच्याकडून खरेदी करणे म्हणजे बी-टू-बी व्यवहार होय.) मध्ये ‘ब’ला १०,००० रुपयांची विक्री दाखविली, परंतु प्रत्यक्ष विक्री २०,००० रुपयांची असेल, तर मे महिन्याच्या जीएसटीआर १ मध्ये ‘अमेंडमेंट टू इन्व्हॉइस’मध्ये दाखविता येते. उर्वरित रकमेवरील कर व्याजासह भरावा लागेल.
अर्जुन : कृष्णा, जर बीटूबीचे बिल चुकून बीटूसीमध्ये (जीएसटीआयएन उपलब्ध नसलेल्या व्यक्तीला विक्री करणे म्हणजे बीटूसी१ व्यवहार होय.) गेले तर काय करावे?
कृष्ण : अर्जुना, बीटूसीमध्ये जर चूक झाली, तर त्यात सुधारणा करता येते. पुढील महिन्याच्या रिटर्नमध्ये ‘अमेंडमेंट टू बी टू सी’मध्ये ती सुधारणा केली जाऊ शकते आणि बीटूबीचे बिल पुढील महिन्याच्या रिटर्नमध्ये मूळ तारखेलाच दाखवावे.
उदा- ‘अ’ने चुकून जानेवारी महिन्यात ५०,००० रुपयांचे बीटूबी हे बीटूसीमध्ये दाखविले, तर फेब्रुवारी महिन्याच्या रिटर्नमध्ये ‘अमेंडमेंट टू बीटूसी’मध्ये सुधारित रक्कम टाकावी व बी टू बी इन्व्हॉइसेसमध्ये जानेवारी महिन्यातील तारीख टाकून बिलाचा संपूर्ण तपशील टाकावा.
अजुर्न : कृष्णा, करदात्याकडून एखादे बीटूबीचे बिलच जीएसटीआर १ मध्ये टाकायचे राहिले तर काय करावे?
कृष्ण : अर्जुना, जीएसटीआर १मध्ये करदात्याकडून एखादे बीटूबी इन्व्हॉइस टाकायचे राहिले, तर तो पुढील महिन्याच्या जीएसटीआर १ मध्ये बीटूबीमध्ये त्या बिलाचा संपूर्ण तपशील टाकू शकतो.
उदा- ‘अ’कडून जून महिन्यात २५,००० रुपयांचे बीटूबी बिल टाकायचे राहिले, तर तो जुलै महिन्यात जीएसटीआर १ मध्ये बीटूबीमध्ये सदर बिलाचा संपूर्ण तपशील टाकू शकतो. त्यावरील कर जर आधी भरला नसेल, तर नंतर त्यावरील संपूर्ण कर व्याजासह भरावा लागेल.
अर्जुन : कृष्णा, रिटर्नमध्ये दाखविलेल्या बिलाचा तपशील डिलीट करता येतो का?
कृष्ण : जीएसटी रिटर्नमध्ये एकदा दाखल केलेला तपशील डिलीट करता येत नाही. पुढील महिन्याच्या रिटर्नमध्ये अमेंडमेंट करून कराची रक्कम निल करता येऊ शकते.
अर्जुन : कृष्णा, असे मागे पुढे बिलाचा तपशील दिला, तर त्याची नोंद कशी ठेवावी?
कृष्ण : अर्जुना, चुकून बिलाची करपात्रता घ्यायची राहिली, तर पुढील महिन्यात का होईना, पण ती घ्यावी लागणार आहे, परंतु या सर्व गोष्टींची नोंद ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी करदात्यांना रिकन्सिलेशन बनवावे लागेल. जेणेकरून वार्षिक रिटर्नच्या वेळी या सर्व सुधारणा सहजपणे शोधल्या जाऊ शकतात.
अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, जीएसटीचे टॅक्स इन्व्हॉइसचे चेकसारखे झाले आहे. आपण त्यात सहजरित्या दुरुस्ती नाही करू शकत. त्यामुळे बिल बनवतानाच काळजीपूर्वक बनवावे. रिटर्न दाखल करतानी संपूर्ण आणि योग्य तपशील दाखल करावा. बिलामध्ये जर काही सुधारणा केल्या असतील, तर त्याचे योग्य रिकन्सिलेशन बनवावे. यामुळे वार्षिक रिटर्नच्या वेळी मदत होईल.
जीएसटी रिटर्न्समध्ये विक्री बिलाच्या चुका कशा सुधाराव्या?
जीएसटी रिटर्नमध्ये विक्रीची माहिती टाकताना काही चुका झाल्या, तर त्या सुधारता येतात का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 05:07 AM2018-07-09T05:07:38+5:302018-07-09T05:07:49+5:30