Maha kumbh mela : सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे गंगा नदीच्या किनारी देशभरातून साधू-संत जमा होत आहेत. हिंदु धर्मातील सर्वात मोठा सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी भरला आहे. पौष पौर्णिमेच्या स्नानाने प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. १२ वर्षातून एकदा होणाऱ्या या कार्यक्रमात १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान ४० कोटी यात्रेकरू सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. हा जगातील सर्वात मोठा मेळावा मानला जातो. याच संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी अदानी, अंबानी यांच्यासह अनेक मोठ्या कंपन्या पाण्यासारखा पैसा यावेळी खर्च करणार आहेत.
प्रयागराज कुंभमेळ्यात ६ शाही स्नान होणार आहेत. कंपन्या त्यांच्या एकूण बजेटपैकी सुमारे ७०% रक्कम या मेळ्यात खर्च करणार आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मार्केटिंगचा प्रचार करण्यासोबतच या कंपन्या ब्रँड एंगेजमेंटसाठी इन्फ्लुएन्सरचीही मदत घेत आहेत. एकूणच काय तर भारतीय कंपन्या त्यांच्या ब्रँडचा प्रचार करण्यासाठी पैसे खर्च करणार आहेत.
क्रेयॉन ॲडव्हर्टायझिंगचे अध्यक्ष कुणाल ललानी, ज्यांच्याकडे महाकुंभसाठी जाहिरातीचे अधिकार आहेत, म्हणाले, “ब्रँड्सना ६ स्नानस्थळाभोवती जास्तीत जास्त जाहिराती हव्या आहेत. कुंभमेळ्यातील एकूण ब्रँडिंग खर्चापैकी जवळपास ७०% खर्च ४५ दिवसांच्या कार्यक्रमादरम्यान शाही स्नानांवर केंद्रित आहे. कुंभच्या पहिल्या दिवशी म्हणजे १३ जानेवारीला ३ कोटींहून अधिक लोक येण्याची शक्यता आहे. महाकुंभ अधिकाऱ्यांच्या मते, आयटीसी, कोका-कोला, अदानी समूह, हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर, बिस्लेरी, पार्क+, इमामी, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स, बँक ऑफ बडोदा आणि स्पाइसजेट या ब्रँडिंग अधिकार विकत घेतलेल्या कंपन्यांमध्ये आहेत.
जाहिरात दर
आयटीसी मधील माचिस आणि अगरबत्ती विभागाचे विभागीय मुख्य कार्यकारी गौरव तयाल यांनी सांगितले की, कंपनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि इन्फ्लुएन्सरच्या माध्यमातून कुंभमध्ये आपल्या ब्रँड्सचा प्रचार करेल. ललानी म्हणाले की २०१९ मधील मागील कुंभपेक्षा ब्रँडिंग दर किमान ५०-६०% जास्त आहेत. बोटी, युनिपोल, होर्डिंग्ज, कमानी, आलिशान तंबू, वॉच टॉवर, वॉटर एटीएम आणि बॅरिकेड्सवर ब्रँडिंगच्या विविध संधी आहेत. कार्यक्रमातील जाहिरातींचे व्यवस्थापन करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने वृत्ती सोल्युशन्स आणि श्रेयस मीडिया या २ इतर जाहिरात एजन्सींना देखील अधिकृत केले आहे. जाहिरात कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका होर्डिंगची किंमत १.५ लाख ते ३ लाख रुपये आहे, तर बॉक्सच्या गेटवर ब्रँडिंगची किंमत २५ लाख रुपये आहे. विजेच्या खांबांवर ब्रँडिंग करण्यासाठी जाहिरातदारांना ३०,००० रुपये मोजावे लागतात.
अदानी समूहाचे ब्रँडिंग
डाबर इंडियाचे प्रमुख मोहित मल्होत्रा म्हणाले, 'आम्हाला वाटते की अशा पारंपारिक मेळ्यांदरम्यान ग्राहकांशी थेट संपर्क साधता येतो. त्यामुळे त्यांच्याशी असलेले आमचे नाते दृढ करण्यास मदत होते. डाबरने स्थानस्थळावर टूथपेस्ट डिस्पेंसर बसवले आहेत. कंपनीचे आमला आणि वाटिका ब्रँड महिला भक्तांसाठी चेंजिंग रूममध्ये १०० हून अधिक ब्रँडेड चेंजिंग रूम, हेअर ड्रायर आणि पॅम्परिंग झोन देत आहेत. अदानी समूहाने ११ युनिपोल, १०० गोल्फ कार्ट, प्रसादम पॉइंट्स, पाच रिसेप्शन गेट्स आणि १५० फीडर बसेस ब्रँडेड केल्या आहेत. याशिवाय धार्मिक संस्था इस्कॉन ५००,००० गीता सार पुस्तकांचे वाटप करत आहे.