Gold Price : सोने खरेदी म्हणजे आपल्या जिव्हाळ्याचा विषय. यासाठी खास मुहूर्तही आहेत. ते कमी पडले तर आपण कुठल्याही औचित्याला सोने खरेदी करत असतो. तुम्ही सोन्याचे कोणतेही दागिने खरेदी करायला जाता तेव्हा तुम्ही आपण पहिला सोन्याचा भाव विचारतो? दागिन्यांच्या दुकानातही अनेक ठिकाणी आजचा सोन्याचा भाव लिहिलेला असतो. सोन्याच्या दरात दररोज थोडा बदल होत असतो. पण सोन्याचे भाव कसे ठरवले जातात? कोण ठरवतात हा प्रश्न तुमच्या मनात आला का? चला आज माहिती करुन घेऊ.
कसा ठरतो सोन्याचा भाव?
तुम्ही ज्वेलर्सकडून ज्या किमतीला सोने खरेदी करता त्याला स्पॉट रेट म्हणतात. या किमती मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) च्या आधारे ठरवल्या जातात. MCX फ्युचर्स मार्केटवरील सोन्याच्या किमती भारतीय बाजारातील सोन्याची मागणी आणि पुरवठा डेटा एकत्रित करून आणि जागतिक बाजारातील चलनवाढीची स्थिती लक्षात घेऊन ठरवल्या जातात. याशिवाय, फ्युचर्स मार्केट लंडनस्थित बुलियन मार्केट असोसिएशनशी देखील सोन्याची किंमत ठरवण्याआधी समन्वय साधते. त्यानंतर या किमती ठरवल्या जातात.
सरकारी निर्णयांचाही सोन्याच्या दरावर परिणाम
देशांतर्गत आणि जागतिक आर्थिक आणि राजकीय निर्णयांचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, आपल्या देशातील सरकारने सोन्याच्या आयातीबाबत कोणताही नवा नियम लागू केला तर त्याचा सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो. त्याच वेळी, सोन्याची निर्यात करणाऱ्या देशातील उत्पादन एखाद्या वर्षात कमी झाले, तर याचाही परिणाम सोन्याच्या किमतीवर होतो. नुकताच मोदी सरकारने सोन्याच्या आयातीलवरील शुल्क घटवले होते. तेव्हा सोने 4 हजारांनी स्वस्त झाले होते.
तुमच्या शहरात सोन्याचे दर कसे ठरतात?
स्पॉट प्राईस, म्हणजे तुम्ही ज्वेलर्सकडून सोन्याची खरेदी करता ती किंमत ही बहुतेक शहरांतील सराफा संघटनांच्या सदस्यांनी बाजार उघडण्याच्या वेळी ठरवली जाते. प्रत्येक शहरातील सराफा व्यापाऱ्यांकडून दर ठरवले जात असल्याने त्यांच्या दरात थोडाफार फरक आहे. सोन्याचे दर कॅरेटनुसार वेगवेगळे ठरवले जातात.
जगात सोन्याचे दर कसे ठरतात?
जगभरातील सोन्याचे भाव लंडनच्या सराफा बाजारात ठरतात. हे जगातील सर्वात मोठे सराफा बाजार आहे. 2015 पूर्वी, लंडन गोल्ड फिक्स ही सोन्याची नियामक संस्था होती जी किमती ठरवते. परंतु, 20 मार्च 2015 नंतर, लंडन बुलियन मार्केट असोसिएशन ही नवीन संस्था तयार करण्यात आली. हे ICE प्रशासकीय बेंचमार्कद्वारे चालवले जाते. ही संस्था जगातील सर्व देशांच्या सरकारांशी संबंधित राष्ट्रीय स्तरावरील संघटनांच्या सहकार्याने सोन्याचा भाव काय असावा हे ठरवते.