नवी दिल्ली : वित्त वर्ष २०२४ मध्ये क्रिप्टो चलन बिटकॉइनने सर्वाधिक परतावा दिला असून, एका बिटकॉइनची किंमत आता एक किलो सोन्याच्या किमतीएवढी झाल्याचे दिसून आले आहे.
गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारात एक किलो सोन्याची किंमत ७१,७८० डॉलर इतकी होती, त्याचवेळी एका बिटकॉइनची किंमत ७०,८४३ डॉलर इतकी होती. चालू वित्त वर्षात बिटकॉइनच्या किमतीत तब्बल १४८ टक्के इतकी वाढ झाली आहे. यात कालखंडात सोन्याच्या किमतीत मात्र केवळ १२ टक्के वाढ झाली आहे. या काळात सेन्सेक्स २५ टक्के, तर निफ्टी २९ टक्के वाढला. कच्च्या तेलाच्या किमती १० टक्के वाढल्या. चांदीने मात्र केवळ ३ टक्के परतावा दिला आहे. रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत १ टक्का घसरली आहे.
बिटकॉइन हे जगातील सर्वांत जुने, सर्वांत मोठे आणि सर्वाधिक लोकप्रिय क्रिप्टो चलन मानले जाते. त्याच्या किमतीत मागील ७ दिवसांत १० हजार डॉलरची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आणखी ४ टक्के वाढ झाल्यास बिटकॉइन सार्वकालिक उच्चांकावर पोहोचेल. अलीकडे बिटकॉइन पहिल्यांदाच ७३ हजार डॉलरवर पोहोचले होते. (वृत्तसंस्था)